विद्यार्थ्यासोबत वर्गातच लग्न करणाऱ्या प्राध्यापिकेचा व्हायरल व्हिडिओनंतर राजीनामा, म्हणाली माझ्याविरुद्ध षडयंत्र…

काही दिवसांपूर्वी एका महिला प्राध्यापिकेने विद्यार्थ्यासोबतच वर्गात लग्न केल्याचा व्हिडीओ प्रचंड व्हायरल झाला होता. हा व्हिडीओ पश्चिम बंगालच्या एका विद्यापिठातील होता. त्यानंतर प्राध्यापिकेवर चहूबाजूने टिका होऊ लागली होती. अशातच त्या प्राध्यापिकेने आता नोकरीचा राजीनामा दिला असून तिचा राजीनामा अद्याप स्वीकारलेला नाही. मात्र त्या प्राध्यापिकेने आपल्याला सहकारी प्राध्यापकानेच बदनाम केल्याचा आरोप केला आहे.

पायल बॅनर्जी असे त्या महिला प्राध्यापकाचे नाव आहे. ही घटना सरकारी मौलाना अबुल कलाम आझाद तंत्रज्ञान विद्यापिठात घडली. पायल या मानसशास्त्र विभागाच्या मुख्य प्राध्यापिका असून वर्गात विद्यार्थ्यासोबत त्यांनी लग्न केले. त्यांच्या लग्नाचा व्हिडीओ  28 जानेवारी रोजी व्हायरल झाला आणि त्या वादात सापडल्या. विद्यापीठाचे कुलसचिव पार्थ प्रतिमा लाहिरी यांनी सांगितले की, पायल यांनी 1 फेब्रुवारी रोजी विद्यापीठाला ईमेल पाठवून सध्याच्या परिस्थितीमुळे पदाचा राजीनामा देण्याची इच्छा व्यक्त केली होती. व्हिडिओ व्हायरल झाल्यामुळे त्या मानसिकदृष्ट्या खचल्याचे त्यांनी सांगितले होते. मात्र विद्यापीठाने अद्याप त्यांचा राजीनामा स्वीकारलेला नाही. विद्यापीठ प्रशासनाने 29 जानेवारी रोजी त्यांना रजेवर पाठवले होते.

पायल यांनी ही घटना ‘सायको-ड्रामा प्रोजेक्ट’चा भाग असल्याचे सांगितले होते, जे विद्यार्थी आणि विद्यापीठाच्या संमतीने करण्यात आले होते. मात्र त्यांच्या एका सहकारी प्राध्यापकाने त्यांची प्रतिमा मलिन करण्यासाठी आणि त्यांचे करिअर उद्ध्वस्त करण्यासाठी जाणूनबुजून व्हिडिओचा एक भाग लीक केला. तिने सांगितले की तिच्या सामाजिक आणि शैक्षणिक प्रतिष्ठेला झालेल्या नुकसानाविरुद्ध ती कायदेशीर कारवाई करेल. प्राध्यापिकेने आधीच तिचे सोशल मीडिया अकाउंट डिलीट केले आहेत.

या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी विद्यापीठाने पाच महिला प्राध्यापकांची समिती स्थापन केली होती. चौकशीत प्राध्यापिकेने केलेला’सायको-ड्रामा प्रोजेक्ट’चा दावा फेटाळण्यात आला आहे. सध्या विद्यापीठ प्रशासन प्राध्यापकांच्या राजीनाम्याचा विचार करत असून यावर लवकरच निर्णय घेतला जाईल.