काँग्रेसचे माजी आमदार सुभाष झांबड यांना अटक, अजिंठा बँक गैरव्यवहार प्रकरणी मोठी कारवाई

अजिंठा बँक गैरव्यवहार प्रकरणी बॅंकेचे चेअरमन व काँग्रेस पक्षाचे माजी आमदार सुभाष झांबड यांना अटक करण्यात आली. जामीन मिळविण्याचे सर्वच दरवाजे बंद झाल्यानंतर अखेर त्यांनी पोलिसांसमोर आत्मसमर्पण केले.

छत्रपती संभाजीनगर शहरातील अजिंठा अर्बन बँकेत 2006 ते 2023 दरम्यान 97 कोटी 41 लाख रुपयांच्या घोटाळा झाला. या प्रकरणी बँकेचे सीईओ प्रदीप कुलकर्णी यांच्यासह बँकेचे अध्यक्ष तथा माजी आमदार सुभाष झांबड यांच्यावर गुन्हा दाखल झाला होता. ते अटकपूर्व जामिनासाठी गेल्या काही दिवसांपासून प्रयत्न करत होते. जामिनासाठीचे सर्वच पर्याय बंद झाल्यानंतर अखेर ते पोलिसांना शरण आले. आर्थिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी त्यांना अटक करून घेतली. अजिंठा बँकेचे झांबड यांनी 60 कोटी भरल्याची माहिती आर्थिक गुन्हे शाखेने दिली.

बँकेचे चेअरमन सुभाष माणकचंद झांबड, संचालक घेवरचंद मोतीलाल बोथरा, तनसुख माणकचंद झांबड, नवीनचंद संघवी, राजेंद्रसिंग जबिंदा, जितेंद्र मुथा, संजय फुलफगर, हरीश भिकचंद चिचाणी, सुशील बलदवा, महेश मन्साराम जसोरिया, सोपान तुळशीराम शेजवळ, उमेश डोंगरे, माणिक चव्हाण, रजनी देसरडा, माधुरी अग्रवाल, अनिल धर्माधिकारी, रवींद्र वाणी, संजय मिठालाल कांकरिया, शिरीष गादिया, दादासाहेब गंडे, नितीन रतनलाल मुगदिया, विद्या प्रफुल्ल बाफणा, कांचन श्रीमंतराव गोर्डे, अब्दुल पटणी, सुनील शंकरलाल सवईवाला, दिलीप हिराचंद कासलीवाल, बँकेचे सीईओ प्रदीप एकनाथ कुलकर्णी, मुख्य व्यवस्थापक संदेश भिवसन वाघ, शाखा व्यवस्थापक चेतन खुशालचंद गादिया, दीपाली देवेंद्र कुलकर्णी आदिंचा या गैरव्यवहारात सहभाग आहे.

वैजापूरच्या आमदारांनी घेतली आर्थिक गुन्हे शाखेच्या अधिकाऱ्यांची भेट

याच बँकेच्या कथेत घोटाळ्यात वैजापूर तालुक्यातील भाजपाचे कार्यकर्ते कल्याण दांगोडे यांना अटक करण्यात आली होती. न्यायालयीन कोठडीनंतर त्यांना जामीन मिळाला आहे. तेव्हापासून त्यांच्या मागे चौकशीचे ससेमिरे लागले आहेत. दोन दिवसापूर्वी कल्याण दांगोडे वैजापूरचे आमदार रमेश बोरणारे व घोटाळ्यातील आरोप असलेले कल्याण दांगोडे त्यांनी पोलीस आयुक्तालयात येऊन आर्थिक गुन्हे शाखेच्या पोलीस अधिकाऱ्यांची भेट घेतली होती. या भेटीनंतर दुसऱ्याच दिवशी माजी आमदार सुभाष झांबड हे आर्थिक गुन्हे शाखेच्या पोलिसांना शरण आले आहेत. त्यामुळे उलट सुलट चर्चांना उधाण आले आहे.