![us plane missing](https://www.saamana.com/wp-content/uploads/2025/02/us-plane-missing-696x447.jpg)
अमेरिकेतील अलास्काजवळ बेरिंग एअर कंपनीचे विमान बेपत्ता झाले आहे. फ्लाइट ट्रॅकिंग वेबसाइट फ्लाइटराडारच्या डेटावरून मिळालेल्या माहितीनुसार, स्थानिक वेळेनुसार, अलास्कातील उनालाक्लीट शहरातून गुरुवारी दुपारी 2 वाजून 37 मिनिटांनी विमानाने उड्डाण केले. मात्र काही वेळातच 3 वाजून 16 मिनिटांनी अलास्कातील नोमजवळ विमान रडारवरून गायब झाले.
विमानात 9 प्रवासी आणि एक पायलट होता. बेपत्ता विमानाचा युद्धपातळीवर शोध सुरू आहे. नोम आणि व्हाईट माउंटनमधील स्थानिकांच्या मदतीने जमिनीवर विमानाचा शोध घेत असल्याचे अलास्का सार्वजनिक सुरक्षा विभागाने सांगितले.
दुर्गम डोंगराळ प्रदेश आणि खराब हवामान यामुळे अलास्कामध्ये विमान दुर्घटना अधिक घडतात. येथील अनेक गावांमध्ये अद्याप रस्ते नाहीत. यामुळे प्रवासी आणि सामानाची वाहतूक करण्यासाठी येथे लहान विमानांचा वापर केला जातो. बेरिंग एअर ही अलास्कातील एक प्रादेशिक विमान कंपनी आहे जी सुमारे 39 विमाने आणि हेलिकॉप्टर चालवते.