![crime news](https://www.saamana.com/wp-content/uploads/2025/01/crime-news-3-696x447.jpg)
कल्याण, डोंबिवलीत अनधिकृत पाण्याचे कनेक्शन घेण्याचे प्रकार वाढले आहेत. चोरून नळ जोडणी घेणाऱ्यांना बक्कळ पाणी आणि प्रामाणिक करदात्यांना कमी दाबाने पाणीपुरवठा असे चित्र कल्याण, डोंबिवलीत आहे. कल्याण पश्चिम येथील जुन्या मच्छी मार्केट परिसरात बेकायदा पाणी कनेक्शन घेण्यास विरोध करणाऱ्या एका तरुणाला फुकट्या नागरिकाने बेदम मारहाण करत चाकूने वार केले.
मुदस्सर काझी हे कल्याण पश्चिममधील जुना मच्छी मार्केट मुल्ला चाळ येथे राहतात. याच परिसरात ताबिज मुल्ला हा पाण्याची एक इंचाची पाइपलाइन टाकत होता. ही अनधिकृत नळ जोडणी असल्याने मुदस्सर याने या नळ जोडणीला विरोध केला. त्यामुळे ताबीज मुल्ला आणि मुदस्सर या दोघांमध्ये वाद झाला. यानंतर ताबीज आणि त्याचा भाऊ अबजल मुल्ला या दोघांनी मुदस्सर याला बेदम मारहाण केली. त्याच्या अंगावर तीक्ष्ण हत्याराने वार केले. या हल्ल्यात मुदस्सर गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. याप्रकरणी बाजारपेठ पोलीस ठाण्यात ताबीज मुल्ला आणि अबजल मुल्ला या दोघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.