तब्बल 5 वर्षानंतर कर्जदारांना दिलासा; रेपो रेटमध्ये 0.25 टक्के कपात, कर्ज स्वस्त होणार

तब्बल 5 वर्षानंतर कर्जदारांसाठी दिलासादायक बातमी आली आहे. रिझर्व्ह बॅक ऑफ इंडियाने रेपो रेटमध्ये 0.25 टक्के कपात करण्याचा निर्णय घेतला आहे. रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर संजय मल्होत्रा यांनी याबाबत माहिती दिली. त्यामुळे रेपो रेट 6.50 टक्क्यांवरून 6.25 टक्क्यांवर आला असून गृह आणि वाहन कर्ज स्वस्त होण्याची शक्यता आहे.

रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या चलनविषयक धोरण समितीची द्वैमासिक बैठक 5 ते 7 फेब्रुवारी दरम्यान पार पडली. या बैठकीमध्ये रेपो रेटमध्ये कपात करण्याचा निर्णय घेण्यात आला, अशी माहिती आरबीआयचे गव्हर्नर संजय मल्होत्रा यांनी दिली. 5 वर्षात पहिल्यांदाच रेपो रेटमध्ये कपात झाल्याने कर्ज स्वस्त होणार असून कर्जदारांचा हप्ताही कमी होणार आहे.

गेल्या दोन वर्षात रेपो रेटमध्ये कोणताही बदल करण्यात आला नव्हता. त्याआधी 5 वर्षांपूर्वी रेपो रेटमध्ये कपात करण्यात आली होती. मार्च 2020 मध्ये रेपो रेटमध्ये 0.75 टक्के कपात करण्यात आली होती. त्यावेळी रेपो रेट 4.40 टक्क्यांवर आणण्यात आला होता. कोविड काळातही यात फार बदल करण्यात आला नव्हता. मात्र त्यानंतर सातत्याने रेपो रेटमध्ये वाढ करत तो 6.50 टक्क्यांपर्यंत नेण्यात आला. यामुळे कर्जदारांचा हप्ता महागला होता.