…मग गडहिंग्लज उपविभागात अवैध धंद्यांना परवानगी द्या !

गडहिंग्लज, आजरा, चंदगड, भुदरगड तालुक्यांत मटका, जुगार, दारूविक्री हे अवैध धंदे मोठ्या प्रमाणात फोफावले आहेत. याकडे लक्ष वेधूनही कारवाई होत नसेल तर मग या अवैध धंद्यांना मुक्त वातावरणात चालवण्यासाठी पोलीस प्रशासनानेच परवानगी द्यावी, अशी मागणी करणारे निवेदन गडहिंग्लज शिवसेनेच्या (उद्धव बाळासाहेब ठाकरे) वतीने पोलीस प्रशासनाला देण्यात आले.

कोल्हापूर जिल्हाप्रमुख प्रा. सुनील शिंत्रे यांच्या नेतृत्वाखाली उपविभागीय पोलीस अधिकारी रामदास इंगवले यांना हे निवेदन देण्यात आले. अवैध धंदे सुरू असून, पोलीस कारवाई करत नसल्याबाबत शिवसैनिकांनी पोलीस प्रशासनाला सुनावले आहे.

निवेदनात म्हटले आहे की, गडहिंग्लज उपविभागातील गडहिंग्लज, आजरा, चंदगड, भुदरगड या तालुक्यांमध्ये मटका, जुगार, गोवा बनावटीची दारू, गावठी दारू, गांजा, कॅफे व लॉजमध्ये छुपा अनैतिक उद्योग राजरोसपणे सुरू आहेत. या अवैध धंद्यांकडे शिवसैनिकांकडून वेळोवेळी निवेदन देत पोलीस प्रशासनाचे लक्ष वेधण्यात आले आहे. मात्र, पोलीस ‘झोपेचे सोंग’ घेत आहेत.

अवैध धंद्यांवर जरब बसविण्यात पोलीस प्रशासन मागे का पडत आहे? त्यांच्यावर कठोर कारवाई करून हे धंदे कायमस्वरूपी बंद का केले जात नाहीत? हा सवाल करण्यात आला आहे. वैद्यकीय व शैक्षणिक हब म्हणून ओळखल्या जाणाऱ्या गडहिंग्लज शहराची ओळख तर आता ‘मटक्याचे शहर’ म्हणून होण्याचे बाकी राहिले आहे. कारण महाराष्ट्रसह शेजारील कर्नाटक राज्यातील लोकही मटका, जुगार खेळण्यासाठी गडहिंग्लज शहरात येत असल्याचे विदारक चित्र सध्या याठिकाणी आहे.

गडहिंग्लज उपविभागात बऱ्याच गावांमध्ये काही वर्षांपूर्वी महिलांनी चळवळ उभी करत देशी दारू दुकाने बंद पाडली होती. मात्र, या गावांमध्ये आजही छुप्या पद्धतीने दारू विक्री सुरू झाली आहे. तालुक्याच्या पूर्व भागातील काही ठिकाणी तर एकाच गावात तब्बल तीन ते चार ठिकाणी गोवा बनावटीची व गावठी दारूविक्री होत आहे. त्यामुळे गडहिंग्लज उपविभागातील मटका, जुगार, गोवा बनावटीची दारू या मूक संमती देऊन जर दुर्लक्ष करत असेल तर मग यापुढे हे धंदे राजरोसपणे, खुल्या व मुक्त वातावरणात चालवण्यासाठी पोलिसांनी परवानगी द्यावी, अशी अनोखी मागणी शिवसैनिकांनी केली आहे.

कारवाईकडे करणाऱ्या दुर्लक्ष पोलीस प्रशासनाला शिवसेनेने सुनावले अवैध धंद्यांकडे पोलीस प्रशासन या निवेदनावर जिल्हाप्रमुख प्रा. सुनील शिंत्रे, उपजिल्हाप्रमुख संभाजी पाटील, चंदगड विधानसभा क्षेत्रप्रमुख राजू रेडेकर, युवासेनेचे अवधूत पाटील, दिलीप माने, अजित खोत, युवराज पोवार, वसंत नाईक, सुधाकर जगताप, दिगंबर पाटील, शहरप्रमुख प्रकाश रावळ, सागर हेब्बाळे, मनीष हावळ, गजराज सासणे, विलास यमाटे, श्रीशैलाप्पा साखरे यांच्यासह इतर शिवसैनिकांच्या सह्या आहेत.