मिंधे, अजित पवार गटाच्या घोटाळेबाजांचा ‘आका’ कोण? आदिवासींचा मोबदला परस्पर हडप केला

बडोदा-जेएनपीए महामार्गासाठी जमिनी दिलेल्या आदिवासी शेतकऱ्यांचा मोबदला परस्पर हडप करणाऱ्या मिंधे गट आणि अजित पवार गटाच्या पदाधिकाऱ्यांचा आका कोण? या चर्चेला सध्या रायगड जिल्ह्यात उधाण आले आहे. या पदाधिकाऱ्यांना नेमका कोणाचा आशीर्वाद आहे की ते इतके मोठे कांड करूनही उजळ माथ्याने फिरत होते. कर्जतमध्ये असलेल्या एका शासकीय अधिकाऱ्याबरोबर या पदाधिकाऱ्यांचे जवळचे आर्थिक हितसंबंध होते. या प्रकरणी चौघांना अटक झाल्यानंतर कर्जत तालुक्यासह रायगड जिल्ह्यात घोटाळेबाजांचा आका कोण असावा? असे तर्कवितर्क राजकीय वर्तुळातून लावले जात आहेत.

आदिवासी शेतकऱ्यांच्या वाट्याला गेलेला सुमारे एक कोटी रुपयाचा मोबदला परस्पर आपल्या नातेवाईकांच्या खात्यात वळता केल्यामुळे बदलापूर ग्रामीण पोलिसांनी रायगड जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष आणि शिंदे गटाचे पदाधिकारी सुरेश टोकरे, नेरळचे माजी सरपंच आणि अजित पवार गटाचे पदाधिकारी संजय गिरी, समीर वेहळे अशा चार जणांच्या मुसक्या आवळल्या आहेत. हे सर्वच जण रायगड जिल्ह्यातील आहेत. त्यांचा तसा ठाणे जिल्ह्याशी थेट संबंध आलेला नाही. त्यामुळे तेथील आदिवासी शेतकऱ्यांशी ओळख तयार करून त्यांच्या बँक खात्यावरील पैसे सहज वळते करणे हे मोठे आव्हान होते. त्यानंतरही हा कारनामा या आरोपींनी केला. त्यामुळे त्यांना नेमका कोणाचा वरदहस्त आहे व त्यांनी घपला केलेली रक्कम नेमकी कोणत्या आकाच्या खात्यात गेली आहे? अशी चर्चा आता राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे.

नेता की अधिकारी

एकेकाळी कर्जत तहसीलदार पद भूषविलेले अधिकारी हे आता उल्हासनगर आणि अंबरनाथ शहरात शासनाचे अधिकारी म्हणून काम पाहत आहेत. एकेकाळी या अधिकाऱ्यांचे या पदाधिकाऱ्यांशी जवळचे संबंध राहिलेले आहेत. त्यामुळे या पदाधिकाऱ्यांचा खरा आका नेमका कोण, अधिकारी की नेता? असा प्रश्न अनेकांना पडला आहे.

■ बदलापूर ग्रामीण पोलिसांनी अचानक धरपकड केलेल्या पदधिकाऱ्यांच्या थेट खात्यावर पैसे जमा केल्याचा हा अजब प्रकार दिसून येत आहे.
■ या गैरव्यवहारप्रकरणी शासनाचे अधिकारी असल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे पोलीस अधिकाऱ्यांनी या प्रकरणी सखोल चौकशी करावी, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.
■ या गैरव्यवहारात आपले नाव समोर येऊ नये म्हणून बड्या आकाने गुन्हे लपविण्यासाठी या पदाधिकाऱ्यांचा प्यादे म्हणून उपयोग केला असल्याची चर्चाही सुरू झाली आहे.