एका 65 वर्षीय वृद्धाला दारू पाजून नाक दाबून खून करणाऱ्या दोघांविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्याचे आदेश येथील प्रथमवर्ग न्यायालयाने पोलिसांना दिले आहे. 11 महिन्यांपूर्वी वैजापूर तालुक्यातील नांदगाव येथे ही घटना घडली होती. शिवलाल लक्ष्मण गायकवाड (65, रा. नांदगाव) असे मृताचे नाव आहे. सुभाष सुजीराम कोल्हे व भरत सखाहरी निकम (दोघे रा. नांदगाव) अशी आरोपींची नावे आहेत.
घटनेतील फिर्यादी संतोष शिवलाल गायकवाड (31) हा वैजापूर तालुक्यातील नांदगाव येथील शेत गट क्रमांक 121 मध्ये राहतात. त्यांचा सुभाष कोल्हे व भरत निकम यांच्याशी जुना वाद आहे. ते दोघे नेहमी कारणाने शिवलाल गायकवाड यांचा मुलगा संतोष गायकवाड यांच्या कुटुंबाला त्रास देत होते.
सुभाष व भरत या दोघांचे गावात दीप हॉटेल आहे. 16 मार्च 2024 रोजी संतोष याचे वडील शिवलाल लक्ष्मण गायकवाड हे हॉटेल दीपमध्ये बेशुद्ध अवस्थेत पडले होते. ही मिळाल्यानंतर संतोष हा हॉटेल पोहोचला. त्या ठिकाणी त्याचे वडील एका खाटावर बेशुद्ध अवस्थेत मिळून आले. त्यानंतर संतोष याने गाडिलांना दवाखान्यात नेले. परंतु डॉक्टरांनी तपासून त्यांना मृत घोषित केले.
शिवलाल गायकवाड यांना तोंड दाबून जबरदस्तीने आरोपींनी त्यांच्या तोंडात दारू ओतल्याने शिवलाल यांना त्रास होऊ लागला. परिणामी ते बेशुद्ध झाले, अशी माहिती हॉटेलमधील प्रत्यक्षदर्शीनी संतोषला दिली. त्यामुळे संतोष यांनी वैजापूर पोलीस ठाण्यात जाऊन खुनाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी केली. परंतु पोलिसांनी गुन्हा दाखल केला नाही. त्यानंतर उपविभागीय पोलीस अधिकारी व पोलीस अधीक्षक यांना निवेदन दिले. परंतु त्यांनीही दखल घेतली नाही. त्यामुळे संतोष यांनी न्यायालयात प्रकरण दाखल केले.
याप्रकरणी प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी एस. के. खान यांनी उपरोक्त दोघांविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले आहेत. हा आदेश सोमवारी देण्यात आला. फिर्यादी पक्षातर्फे अॅड. यासेरअली सय्यद यांनी काम पाहिले.
या प्रकरणी संतोष गायकवाड यांच्या फिर्यादीवरून सुभाष कोल्हे व भरत निकम या दोघांविरुद्ध वैजापूर पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास फौजदार स्वप्निल नरवडे हे करीत आहेत.