
‘शिकारी खुद यहा शिकार हो गया’ याचा प्रत्यय पालघरच्या बोरशेती जंगलात आला. शिकार करणाऱ्यांनी अचूक नेम धरला, पण तो चुकला आणि गोळी शिकाऱ्यांमधील एका साथीदारालाच लागली. रमेश वरठा असे त्याचे नाव असून या दुर्घटनेत त्याचा मृत्यू झाला. विशेष म्हणजे त्याचा मृतदेह लपवून साथीदारांनी पळ काढण्याचा प्रयत्न केला. पण मनोर पोलिसांनी 12 जणांना अटक केली. शिकारीच्या नादात शिकाऱ्यावरच गोळीबार झाल्याने एकाला नाहक आपला जीव गमवावा लागला.
बोरशेती, किराट, रावते व आकोली या गावातील बारा शिकाऱ्यांनी 28 जानेवारी रोजी बोरशेतीच्या जंगलात रानडुकरांच्या शिकारीसाठी जाण्याचा निश्चय केला. त्यानुसार रात्री शिकार मोहिमेवर निघाले होते. डोंगराच्या पायथ्याशी असलेल्या पाणवठ्यावर वाघ व रानडुक्कर पाणी पिण्यासाठी येत असतात. या ठिकाणी बंदूकधारी शिकारी दबा धरून बसले होते. शिकारीसाठी गेले असताना काळोखी रात्र असल्याने काही दिसत नव्हते. याचदरम्यान काही साथीदारांना शिकारीसाठी यायला उशीर झाला असताना ते त्या ठिकाणी आले. दरम्यान आवाजाच्या अंदाजावरून दबा धरून बसलेल्या शिकाऱ्यांनी बंदुकीतून गोळी झाडली गेली. या गोळीबारात रमेश वरठा यांचा जागीच मृत्यू झाला.
… असा झाला भंडाफोड
भयभीत झालेल्या शिकाऱ्यांनी रमेशचा मृतदेह झाडाखाली लपवत पळ काढला. रमेशचा शोध लागत नसल्याने कुटुंबीयांनी मनोर पोलीस ठाण्यात मिसिंगची तक्रार दाखल केली होती. पोलिसांनी तपास सुरू केल्यानंतर रमेशचा मृतदेह सापडला आणि शिकारीचा भंडाफोड झाला.
बंदुका केल्या जप्त
याप्रकरणी आरोपी सागर हाडळ, नंदकुमार वायडा, शांताराम भूतकडे यांच्यासह आठ जणांना अटक करण्यात आली असून दोन आरोपी फरार आहेत. पोलिसांनी सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल केला असून बंदुका जप्त करण्यात आल्या असल्याचे पोलिसांनी सांगितले.