![vicky kaushal](https://www.saamana.com/wp-content/uploads/2025/02/vicky-kaushal-696x447.jpg)
छत्रपती शिवाजी महाराजांनी गडकिल्ल्यांचे वैभव महाराष्ट्राला दिले. हे वैभव जपण्याची, त्यांचे संवर्धन करण्याची जबाबदारी सर्वांची असल्याचे मत अभिनेता विकी कौशल याने व्यक्त केले. छत्रपती संभाजी महाराजांच्या जीवनावर आधारित ‘छावा’ चित्रपटाचा ट्रेलर प्रसिद्ध झाला, त्यानिमित्ताने विकी पत्रकारांशी बोलत होता.
छत्रपती संभाजीनगर येथील नूपुर चित्रपटगृहात विकी कौशल अभिनित ‘छावा’ चित्रपटाचा ट्रेलर प्रसिद्ध करण्यात आला. यावेळी पत्रकारांशी संवाद साधताना त्याने छत्रपती संभाजीराजांची भूमिका साकारण्यासाठी घेतलेल्या कष्टाची माहिती दिली.
अडीच वर्षांपासून दिग्दर्शक लक्ष्मण उतेकर हे चित्रपटाची तयारी करत होते. छत्रपती संभाजीराजे समजून घेण्यासाठी त्यांच्याविषयी असलेले साहित्य वाचले. वजन वाढवले. घोडेस्वारी, तलवारबाजी शिकलो. त्याचबरोबर छत्रपतींच्या चालण्या-बोलण्यातली राजेशाही ढब याचाही बारकाईने अभ्यास केला, असे तो म्हणाला.
छत्रपती शिवाजीराजे, छत्रपती संभाजीराजे ही उत्तुंग व्यक्तिमत्त्वे आहेत. त्यांच्या भूमिका साकारणे हे अतिशय कठीण. त्यातही छत्रपती संभाजीराजांच्या भूमिकेला विविध कंगोरे आहेत. यासाठी आम्ही गडकिल्ले पालथे घातले. जेथे जेथे शंभूराजांचा पदस्पर्श झाला, त्या ठिकाणची माती आम्ही कपाळी लावली. हा सर्व अनुभव अतिशय रोमांचकारी होता, असे विकी म्हणाला.
घृष्णेश्वराचे दर्शन घेतले
अभिनेता विकी कौशल याने छत्रपती संभाजीनगरात आल्यानंतर प्रथम छत्रपतींचे मूळगाव असलेल्या वेरूळ येथे ज्योतिर्लिंग घृष्णेश्वराचे दर्शन घेतले. हा परिसर अतिशय सुंदर आणि समृद्ध असल्याचे तो म्हणाला. त्यानंतर विकी कौशल याने क्रांतीचौकातील छत्रपतींच्या अश्वारूढ पुतळ्याला अभिवादन केले. यावेळी त्याला पाहण्यासाठी मोठी गर्दी झाली होती.