मी ठाणे जिल्ह्याचा संपर्कमंत्री, जनता दरबार कधीही घेईन! नाईकांनी मिंध्यांना पुन्हा डिवचले

ठाणे जिल्ह्याचा संपर्कमंत्री म्हणून माझी निवड झाली आहे. त्यामुळे मी ठाण्यात जनता दरबार कधीही घेईन असे म्हणत वनमंत्री आणि पालघर जिल्ह्याचे पालकमंत्री गणेश नाईक यांनी पुन्हा मिंध्यांना डिवचले आहे. तसेच जनता दरबार कोणीही कुठे घेऊ शकतो. महायुतीच्या मंत्र्यांनी जिकडे पाहिजे तिकडे दरबार घ्यावा, असे आवाहन नाईक यांनी करीत मी लवकरच जनता दरबार घेणार असल्याची आठवण करून दिली.

ठाण्यातील पाचपाखाडी येथे वंदे मातरम संघाच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या माघी गणेशोत्सवाला गणेश नाईक यांनी बुधवारी भेट दिली. या वेळी नाईक यांनी गणपती बाप्पाचे दर्शन घेत जनता दरबारावर पुन्हा एकदा भाष्य केल्याने ठाण्यातील मिंधे गटात अस्वस्थता निर्माण केली आहे. काही दिवसांपूर्वी नाईक यांचा कोपरी येथे भव्य नागरी सत्कार सोहळा पार पडला. त्या वेळी ठाण्यात जनता दरबार घेणार अशी घोषणा नाईकांनी केल्यानंतर राजकीय वातावरण चांगले तापले होते.

भाजपच्या माजी नगरसेवकांचा आग्रह

गणेश नाईक ठाण्यात गणपती दर्शनासाठी येणार असल्याने भाजपमधील अनेक माजी नगरसेवक उपस्थित होते. ठाण्यात भाजपचा मोठा नेता कोणी नाही, त्यामुळे भेडसावणाऱ्या अनेक समस्या कोणाच्या दरबारी मांडायच्या? असा प्रश्न लोकप्रतिनिधींना पडला आहे. त्यामुळे लवकरच जनता दरबाराची घोषणा करावी असा आग्रह माजी नगरसेवकांनी नाईकांना धरला.

राजकीय कलगीतुरा

मला भाजपने ठाणे जिल्ह्याचा संपर्क मंत्री म्हणून नेमले असून मी जनता दरबार कधीही घेईन असे वक्तव्य गणेश नाईक यांनी केल्याने ठाण्यातील मिंध्यांच्या बगलबच्च्यांमध्ये चलबिचल सुरू झाली आहे. नाईक यांनी कोणी कुठेही जनता दरबार घेऊ शकते असेही सांगितल्याने मिंधे व नाईक समर्थक यांच्यात राजकीय कलगीतुरा रंगला आहे.