![vasai crime news](https://www.saamana.com/wp-content/uploads/2025/02/vasai-crime-news-696x447.jpg)
वसईच्या मयंक ज्वेलर्स या दुकानावर 10 जानेवारी 2025 रोजी दरोडा पडला होता. चोरांनी दुकानाचे मालक महेंद्रसिंह संघवी यांना मारहाण करून दुकानातील सोने लुटून नेले होते. या दरोड्यात 950 ग्रॅम सोन्याची लूट झाली होती. या दरोड्याची उकल पोलिसांनी नुकतीच केली. मात्र ज्वेलर्स मालकाने पोलिसांच्या तपासावरच संशय व्यक्त केला आहे. साडेनऊशे ग्रॅम सोन्याची चोरी झाली असताना पोलिसांनी फक्त 300 ग्रॅम सोने परत केले आहे. मग उर्वरित 600 ग्रॅम कुठे गेले? असा सवाल मालकाने केला आहे. सोन्याचा हिशोबच जुळत नसल्याने माणिकपूर पोलिसांचा तपास म्हणजे सब गोलमाल है अशीच चर्चा वसईत सुरू आहे.
माणिकपूर आणि बालीव पोलिसांच्या गुन्हे प्रकटीकरण शाखेने या प्रकरणी तपास करून 5 जणांच्या टोळीला अटक केली. या आरोपींनी 47 तोळे सोने चोरल्याची कबुली दिली होती. ते सोने वितळवून कर्नाटक येथील 3 सोनारांना विकले होते. पोलिसांनी ते सोने हस्तगत केले आहे. मात्र 950 ग्रॅम म्हणजे 95 तोळे सोने चोरीला गेले असताना केवळ 293 ग्रॅम सोने परत मिळवले आहे.
सराफ संघटनेचा मोर्चाचा इशारा
सोने वितळविल्यावर घट 2 ते 5 टक्के होते. 20 टक्के घट होतच नाही असा दावा त्यांनी केला. या प्रकरणी आठवड्याभरात जर आमचे सोने परत मिळाले नाही, तर वसईतील सराफांच्या संघटनेमार्फत आंदोलन केले जाईल असा इशारा त्यांनी पत्रकार परिषदेत दिला.