हिंदूंनो, इंग्लिश बोलू नका आणि पारंपरिक कपडेच घाला! मोहन भागवतांचा अजब आदेश

हिंदूंनी इंग्रजी भाषेत बोलू नये, हिंदू धर्मातील लोकांनी सार्वजनिक कार्यक्रमांमध्ये पारंपरिक कपडेच घालावेत, पाश्चात्य पोशाख घालू नयेत, आपले स्थानिक खाद्यपदार्थच खावेत, असे अजब आदेश सरसंघचालक मोहन भागवत यांनी दिले आहेत.

केरळच्या पठाणमथिट्टा येथे हिंदू एकता परिषदेत मार्गदर्शन करताना मोहन भागवत म्हणाले, हिंदू धर्मातील प्रत्येक कुटुंबाने किमान आठवडय़ातून एकदा एकत्र येऊन प्रार्थना करावी आणि त्यांची सध्याची जीवनशैली परंपरेनुसार आहे का यावर चर्चा करावी. आपण बोलत असलेली भाषा आणि आपले कपडे हिंदू परंपरेशी जुळतात का याचाही विचार करायला हवा.

हिंदू समाजाने आपल्या अस्तित्वासाठी एकत्र यावे आणि एक समुदाय म्हणून स्वतःला मजबूत करायला हवे. हिंदू धर्मात कोणीही श्रेष्ठ किंवा कनिष्ठ नाही, जात महत्त्वाची नाही आणि अस्पृश्यतेला स्थान नाही. सर्व हिंदू एकत्र आले, तर जगाचे कल्याण होईल. शक्तीचा वापर विनाकारण इतरांना हानी पोहोचवण्यासाठी करू नये, असे आवाहन भागवत यांनी यावेळी केले.

हिंदू धर्म सर्व धर्माचा आदर करतो

जगभरात होणाऱया संघर्षाला धर्म कारणीभूत आहे. कारण अनेक लोकांना असे वाटते की, त्यांचा धर्म आणि श्रद्धा सर्वोच्च आहेत. परंतु हिंदू धर्म वेगळा असून तो सर्व धर्मांचा आदर करतो आणि एकात्मतेलाही प्राधान्य देतो. धर्माचे पालन नियमांनुसार केले पाहिजे आणि नियमांच्या कक्षेत कोणत्याही प्रथा बसत नसतील, तर त्या रद्द केल्या पाहिजेत. जातीयवाद आणि अस्पृश्यता हे धर्म नाहीत, असे नारायण गुरू सांगत होते, असे भागवत म्हणाले.