हातात बेड्या, पायात साखळदंड चाळीस तासांच्या नरकयातना, अमेरिकेहून परतलेल्या हिंदुस्थानींच्या वेदना

हातात बेड्या, पायात साखळदंड बांधून विमानात ढकलण्यात आले. जागेवरून एक इंचही हलण्याची परवानगी नव्हती. एकच शौचालय… त्याचा वापर करण्याची वेळ आली की वारंवार विनंती केल्यानंतर साखळदंडाने जखडलेले पाय खेचतच शौचालयापर्यंत न्यायचे आणि आतमध्ये अक्षरशः ढकलायचे. ना पुरेसे अन्न… ना प्यायला पुरेसे पाणी… अशा नरकयातना भोगतच तब्बल चाळीस तासांच्या प्रवासाने आमच्या सहनशीलतेचा अंत पाहिला… असा काळजाचा थरकाप उडवणारा वेदनादायी अनुभव अमेरिकेहून परतलेल्या हिंदुस्थानींनी सांगितला.

104 बेकायदा हिंदुस्थानी स्थलांतरित, 11 क्रू मेंबर्स आणि बेकायदा प्रवाशांना सातत्याने तुच्छ नजरेने पाहणारे 45 अमेरिकी लष्कराचे जवान विमानात होते. अमेरिकेने पहिल्यांदाच अशा प्रकारे लष्करी विमानाचा वापर बेकायदा स्थलांतरितांना त्यांच्या देशात परत पाठवण्यासाठी केला. प्रवाशांमध्ये 23 महिला, 12 मुले आणि 79 पुरुष होते. सर्वजण 10 ते 41 वयोगटातील होते. एखाद्या कैद्याप्रमाणे आमच्या हातात बेडय़ा आणि पायात साखळदंड बांधले होते. शौचालयाला जाण्यासही परवानगी नव्हती. खायला दिले तरी ते बेडय़ा घातलेल्या हातांनीच खायला लागायचे, असा अनुभव पंजाबचे जसपाल सिंग यांनी सांगितला. अमेरिकेत जाण्यासाठी 30 लाख रुपये दिले, पण मला एजंटने धोका दिला. सगळे पैसे गेले. त्यानंतर अवैधरीत्या सीमेपार पाठवण्यात आले, परंतु आता परत हिंदुस्थानात यावे लागले, असे जसपाल सिंग म्हणाले.

पाणी दिले, पण बेड्या काढल्या नाहीत

वारंवार विनंती केल्यानंतर थोडे पाणी मिळाले, पण ते पिण्यासाठी बेडय़ा तरी काढा अशी वारंवार विनंती करूनही बेडय़ा काढल्या नाहीत. त्यामुळे जड बेडय़ा उंचावून कसेबसे पाणी प्यावे लागत होते. लहान मुलांनाही त्यांनी सोडले नाही, असे हरविंदर सिंग यांनी सांगितले. थोडेसे अन्न दिले, पण अन्नदेखील बेडय़ा घातलेल्या हातांनीच खावे लागले, असे ते म्हणाले.

अमेरिकेत लग्न करण्यासाठी गेली आणि पकडले

अमृतसरची 26 वर्षांची तरुणी सुख कौर लग्न करण्यासाठी अमेरिकेत गेली होती. तिचे मामा आणि बहीण तेथे स्थायिक आहेत. त्यांनीच एका मुलाचे स्थळ सुचवले होते. हा तरुण सात वर्षांपासून कॅलिफोर्नियात राहतो. 2 जानेवारीला कुटुंबाने तिला मोठय़ा आशेने स्पेनला पाठवले. तिथून 20 दिवसांनी ती अमेरिकेला पोहोचली. तिथे जाऊन लग्न केल्यानंतर सर्वकाही ठीक होईल असे तिच्या कुटुंबीयांना वाटत होते, परंतु अमेरिकेत पोहोचल्यानंतर महिनाभरातच तिला परत पाठवण्यात आले. तिला अमेरिकेत पाठवण्यासाठी 40 लाख रुपये जमा केले होते. तिचे आई-वडील शेतकरी आहेत.

हिंदुस्थानात परत पाठवण्यासाठी सहा कोटी खर्च

बेकायदा हिंदुस्थानी स्थलांतरितांना भविष्यात अमेरिका, कॅनडा, न्यूझीलंड, ऑस्ट्रेलिया, ब्रिटनसह 20 देशांमध्ये जाण्यास मज्जाव असणार आहे. हे सर्व देश अमेरिकेच्या परराष्ट्र धोरणाचा अवलंब करतात. आणखी 186 स्थलांतरितांना परत पाठवण्यात येणार आहे, परंतु त्यांना कधी पाठवणार याबाबत सांगण्यात आलेले नाही. पहिली तुकडी हिंदुस्थानात पाठवण्यासाठी एकूण सहा कोटी रुपयांचा खर्च आल्याचे समोर आले आहे.

आता मीठ घ्यायलाही पैसे नाहीत

41 लाख रुपयांचे कर्ज काढून मुलाला डंकी मार्गाने अमेरिकेत पाठवले. 15 दिवसांपूर्वी तो अमेरिकेला पोहोचला, पण आता परत आला. प्रदीप मोहालीची आई सांगत होती. घर, गाडी घेऊन सुखाने राहू, असे प्रदीप म्हणायचा. त्याचे वडील नैराश्यात आहेत. कर्ज काढून आणि जमीन विकून पैसे जमवले. आता मीठ घ्यायलाही पैसे नाहीत, असा टाहो तिने फोडला.

मोदी सरकारने रोजगार दिला नाही

मोदी सरकारने आम्हाला रोजगार दिला नाही, हाताला काम दिले नाही. आता निदान चांगले आयुष्य जगण्यासाठी धडपडणाऱया आमच्यासारख्या लोकांसाठी अमेरिकन सरकारशी बोलावे तरी, असा आक्रोश बेकायदा स्थलांतरित हिंदुस्थानी हरविंदर सिंग यांची पत्नी हरविंदर काwर यांनी केला. ट्रव्हल एजंट जसकिरण सिंग याला अमेरिकेत जाण्यासाठी 42 लाख रुपये दिले. त्यासाठी जमीन विकली, सोने विकले. आता आमच्याकडे काहीच उरले नाही, आम्ही बरबाद झालो, असे त्या टाहो पह्डत म्हणाल्या. मोदी सरकार गप्पच आहे, पण ‘आप’ सरकारनेही मूग गिळले आहेत का? असा सवालही त्यांनी केला

इंधन भरण्यासाठी थांबले, पण विमानातून बाहेर येऊ दिले नाही

विमान इंधन भरण्यासाठी तब्बल चार ठिकाणी थांबले, परंतु कुणालाही विमानातून थोडय़ा वेळासाठीही बाहेर येऊ दिले नाही. 40 तास आम्ही सर्वजण एकाच जागी बसून होतो. अनेक मुलांच्या अश्रूंचा बांध फुटला आणि ती जोरजोरात रडू लागली, परंतु त्यांचीही लष्कराचे अधिकारी, जवानांना दया आली नाही, असे प्रवाशांनी सांगितले.

स्वप्नांसाठी दीड कोटीचा चुराडा

लवप्रीत कौर यांना त्यांच्या दहा वर्षांच्या मुलासह अमेरिकेहून परत पाठवण्यात आले. त्यांनी एजंटला तब्बल दीड कोटी रुपये दिले होते. डंकी मार्गाने अनेक देशांतून प्रवास करावा लागला. कोलंबिया, ग्वाटेमला, मेक्सिको असा प्रवास करत 27 जानेवारीला अमेरिकेत पोहोचलो, पण सीमा ओलांडताच अमेरिकन अधिकाऱयांनी ताब्यात घेतल्याचे त्या म्हणाल्या. अमेरिकेत गेल्यानंतर मुलाचे भविष्य उज्ज्वल होईल, या आशेपोटी लवप्रीतच्या कुटुंबीयांनी कर्ज काढून दीड कोटीची रक्कम गोळा केली होती.

संसदेत बेडय़ा घालून विरोधकांचे आंदोलन

विरोधकांनी संसद परिसरात बेडय़ा घालून आंदोलन केले. ती माणसे आहेत कैदी नाहीत, असे फलक त्यांनी झळकावले. काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे, लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी, प्रियंका गांधी, सपाचे अध्यक्ष अखिलेश यादव यांच्यासह इंडिया आघाडीचे खासदार आंदोलनात सहभागी झाले. मोदी-ट्रम्प हे चांगले मित्र म्हणता, मग हिंदुस्थानी नागरिकांना अशी वागणूक का दिली, असा सवाल यावेळी प्रियंका यांनी केला.