महाराष्ट्राने सायकलिंगमधील पदकांची मालिका कायम राखत 38 व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत सांघिक सुवर्ण यशाला गवसणी घातली. सांघिक महिला स्प्रिंट प्रकारात मयूरी लुटे, शशिकला आगाशे अदिती डोंगरे व श्वेता गुंजाळ यांनी सुवर्ण भरारी घेतली.
डोंगरदऱयातील रुद्रपूरमधील सायकलिंग ट्रकवर सांघिक स्प्रिंट प्रकारात एक मिनिट 15.690 सेकंदांत शर्यत पूर्ण करून महाराष्ट्राच्या महिलांनी बाजी मारली. गतवेळच्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेतही महाराष्ट्राने याच क्रीडा प्रकारात सुवर्ण पदक जिंकले होते. मयूरी, शशिकला, अदिती व श्वेता यांनी सायकलिंगमधील अप्रतिम कौशल्याचा प्रत्यय घडवित सुवर्णपदक जिंकले. सुरुवातीपासूनच महाराष्ट्राच्या खेळाडूंनी सुरेख समन्वय दाखविताना वेगातही सातत्य दाखविले होते. त्यामुळेच महाराष्ट्राला या शर्यतीमधील आपले वर्चस्व राखता आले. या शर्यतीमध्ये अंदमान व निकोबार संघाने रौप्य पदक, तर ओडिशा संघाने कांस्य पदक मिळविले.