National Games 2025: स्वप्नील कुसाळेला नेमबाजीत कांस्य पदकावर समाधान, मिश्र दुहेरीत राही-प्रवीण जोडीला कांस्य

ऑलिम्पिक कांस्यपदक विजेता नेमबाज स्वप्नील कुसाळे याने 38 व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत पिछाडीवरून जोरदार मुसंडी मारत महाराष्ट्राला कांस्य पदक जिंकून दिले. याचबरोबर राही सरनोबत व प्रवीण पाटील या जोडीने मिश्र दुहेरीच्या एकतर्फी लढतीत बाजी मारत महाराष्ट्राला आणखी एक कांस्य पदक जिंकून दिले.

त्रिशूल शूटिंग रेंजवर गुरुवार, 6 फेब्रुवारी रोजी संपलेल्या नेमबाजी स्पर्धेत अखेरच्या दिवशी महाराष्ट्राची दोन कांस्य पदकाने सांगता झाली. ऑलिम्पिक पदकविजेत्या स्वप्नील कुसाळेने सुरुवातीच्या संघर्षानंतर स्वतःला सावरत पुरुषांच्या 50 मीटर रायफल थ्री पोझिशन प्रकारात 447.7 गुणांसह कांस्यपदकाला गवसणी घातली. सेनादलाच्या नीरज कुमारने एकूण 464.1 गुणांसह सुवर्ण पदकावर मोहोर उमटवली, तर मध्य प्रदेशचा प्रताप सिंग तोमर 562.4 गुणांसह रौप्य पदकाचा मानकरी ठरला.

राही-प्रवीणची एकतर्फी बाजी

राही सरनोबत आणि प्रवीण पाटील या महाराष्ट्राच्या जोडीने 10 मीटर एअर पिस्तूल मिश्र दुहेरीच्या एकतर्फी लढतीत यजमान उत्तराखंडच्या जोडीचा 17-3 असा धुव्वा उडवून कांस्य पदक जिंकले. 10 फेऱयांचा या लढतीत राही-प्रवीण या जोडीने सहज बाजी मारली. नवख्या उत्तराखंडच्या जोडीचा पराभव झाला असला तरी त्यांनी इथपर्यंत मजल मारून उपस्थितांची मने जिंकली.