![amravati farmer protest](https://www.saamana.com/wp-content/uploads/2025/02/amravati-farmer-protest-696x447.jpg)
‘शेतकऱ्यांच्या सोयाबीन, तूर, कापसाला हमीभाव मिळालाच पाहिजे’, ‘नाफेडची खरेदीची मुदत वाढवा’ अशा जोरदार घोषणा देत अमरावतीमध्ये संतप्त शिवसैनिकांनी मंत्री दादा भुसे यांच्या गाड्यांच्या ताफ्यावर सोयाबीन फेकले. त्याचप्रमाणे जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये घुसून जोरदार घोषणाबाजी केली.
सोयाबीनला आठ हजार रुपये, तुरीला 12 हजार रुपये आणि कापसाला क्विंटलमागे 10 हजार रुपये भाव देण्यात यावा, अशी जोरदार मागणी करत शिवसेनेच्या वतीने आज जिल्हाधिकारी कार्यालयावर आंदोलन करण्यात आले. संतप्त आंदोलकांनी कृषीमंत्री दादा भुसे यांच्या गाड्यांच्या ताफ्यावर सोयाबीन आणि कापूस फेकून निषेध नोंदवला. जिल्हाप्रमुख पराग गुडधे यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या या आंदोलनात मनोज कडू, नरेंद्र पडोळे यांच्यासह ओंकार ठाकरे, प्रफुल भोजने, महेंद्र दीपटे, राजेश शर्मा, याह्या खान पठाण, राजेश बंड, नितीन हटवार, नरेंद्र निर्मळ, भैयासाहेब निर्मळ यांच्यासह अमरावती जिह्यातील शिवसैनिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.