Crime News – फिल्मी स्टाईल पाठलाग करून पोलिसांची चोरांवर झडप

नागपाडा येथील एका हार्डवेअरच्या दुकानातून लॅपटॉप आणि लाखाची रोकड असा ऐवज घेऊन दोन चोरटे पसार झाले होते. जे. जे. मार्ग पोलीस त्यांचा शोध घेत होते. दरम्यान ते आरोपी रे रोड परिसरात आल्याचे कळताच पोलीस तेथे धडकले. पण पोलीस आल्याची कुणकुण लागताच दोघेही पळू लागले. त्यांनी धावती लोकल पकडली, पण पोलिसांनीदेखील ती लोकल पकडून त्या चोरांच्या अगदी फिल्मी स्टाईल मुसक्या आवळल्या.

नागपाड्याच्या मस्तान तलाव मार्गावर बेस्ट हार्डवेअर टूल्स नावाचे दुकान आहे. अज्ञात चोरांनी बंद शटरचे कुलूप उचकटून दुकानातील लॅपटॉप व एक लाखाची रोकड असा ऐवज चोरून नेला होता. याप्रकरणी दुकान मालकाने दिलेल्या तक्रारीवरून जे. जे. मार्ग पोलिसांनी घरफोडीचा गुन्हा दाखल करून आरोपीचा शोध सुरू केला. पोलिसांनी घटनास्थळावरील सीसीटीव्ही तपासले असता  घरफोडी करणारे दोन्ही आरोपी हे सराईत असल्याचे स्पष्ट झाले. आरोपी हे नशेबाज असल्याने ते नशा करण्यासाठी रे रोड परिसरात येणार असल्याची माहिती पोलिसांनी खबऱ्यांकडून मिळवली. पोलिसांनी त्यांचा पाठलाग करून आरिफ ऊर्फ राऊफ खान ऊर्फ कुबड्या (35) आणि फिरोज शेख (32) अशा दोघांना पकडले. या दोघांविरोधात मुंबई व नवी मुंबईतील पोलीस ठाण्यांत अनेक गुन्हे दाखल आहेत.

घातक शस्त्र प्रकरणी एकाला अटक  

घातक शस्त्रांसह एकाला जोगेश्वरी पोलिसांनी बेड्या ठोकल्या. गौस सय्यद असे त्याचे नाव आहे. त्याच्याकडून पोलिसांनी दहा लाख रुपये रोकड, देशी बनावटीचे पिस्तूल, गावठी कट्टा, सहा जिवंत काडतुसे जप्त केली. त्याला अटक करून न्यायालयात हजर केले होते.

जोगेश्वरी परिसरात काही जण घातक शस्त्रे घेऊन येणार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्या माहितीची सत्यता पोलिसांनी पडताळली. पोलिसांनी पश्चिम द्रुतगती महामार्ग येथे सापळा रचला. बुधवारी रात्री गौस तेथे आला. त्याला पोलिसांनी ताब्यात घेतले. त्याच्याकडून दहा लाख रुपये रोकड, देशी बनावटीचे पिस्तूल, देशी बनावटीचा कट्टा, सहा जिवंत काडतुसे जप्त केली. शस्त्र बाळगल्याप्रकरणी त्याच्याविरोधात गुन्हा नोंद करण्यात आला.

बंदी असलेल्या प्लॅस्टिक पिशव्या घेऊन जाणारा टेम्पो पकडला

वडाळ्याच्या चार रस्ता येथे आज वाहतूक पोलिसांनी चांगली कामगिरी केली. साकीनाक्याहून आलेला टेम्पो भरधाव वेगात डोंगरीच्या दिशेने चालला होता. चालकाने एसएनडीटी महाविद्यालयापुढील सिग्नलदेखील तोडला, पण लगेच त्याला कर्तव्यावर असलेल्या वाहतूक पोलिसांनी पकडले. संशयावरून टेम्पोची तपासणी केली असता त्यात 300 हून अधिक किलो बंदी असलेल्या प्लॅस्टिकच्या पिशव्या मिळून आल्या.

वाहतूक शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक दीपक फोलाने आणि उपनिरीक्षक लोखंडे हे चार रस्ता येथील एसएनडीटी महाविद्यालयापुढील सिग्नलवर कार्यरत होते. दुपारी साडेबाराच्या सुमारास एक टेम्पो वेगात आला आणि त्याने सिग्नल तोडला. त्यामुळे अधिकाऱ्याने तो टेम्पो थांबवला. पण चालकाची हालचाल संशयास्पद वाटल्याने पोलिसांनी टेम्पो तपासला असता त्यात प्लॅस्टिक पिशव्यांचे घबाड आढळून आले. पालिका अधिकाऱ्यांनी पिशव्यांची तपासणी केली असता त्या प्रतिबंधित प्लॅस्टिक पिशव्या निघाल्या. डोंगरी परिसरात या प्लॅस्टिक पिशव्यांचा साठा टेम्पोतून घेऊन निघाला होता. याप्रकरणी पालिका व पोलिसांनी आवश्यक ती कारवाई केली.