बीडीडी चाळ पुनर्विकास प्रकल्पाचे काम जोरात, आदित्य ठाकरे यांनी घेतला कामाचा आढावा

शिवसेना नेते, युवासेना प्रमुख-आमदार आदित्य ठाकरे यांनी आज वरळी आणि ना. म. जोशी मार्गावरील बीडीडी चाळींच्या फेज-1 गृहप्रकल्पाच्या कामकाजाची पाहणी करीत संबंधित अधिकाऱयांशी चर्चा केली. तब्बल 100 वर्षे जुन्या बीडीडी चाळींच्या जागी उभ्या राहिलेल्या या उत्तुंग इमारती पाहून हा गृहप्रकल्प नियोजित वेळेत पूर्णत्वास येत असल्याचा आनंद आहे, अशी भावना आदित्य ठाकरे यांनी यावेळी व्यक्त केली.

‘म्हाडा’च्या माध्यमातून ना. म. जोशी मार्ग, वरळी आणि नायगाव या तीन बीडीडी चाळींचा पुनर्विकास केला जात आहे. महाविकास आघाडीच्या काळात या प्रकल्पाच्या कामाला सुरुवात झाली होती. आज आदित्य ठाकरे यांनी वरळी आणि ना. म. जोशी मार्गावरील बीडीडी चाळींच्या फेज-1 गृहप्रकल्पाच्या कामकाजाची पाहणी केली. यावेळी आमदार सुनील शिंदे, विभागप्रमुख-माजी नगरसेवक आशीष चेंबूरकर हेदेखील उपस्थित होते.

या गृहप्रकल्पास सुरुवात झाल्यापासून प्रत्येक महिन्यात शिवसेना नेते, युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे प्रकल्पस्थळी भेट देऊन आढावा घेत आहेत. येथील स्थानिकांशी तसेच संबंधित अधिकाऱयांशी चर्चा करून प्रकल्पातील अडथळे, समस्या जाणून घेत आहेत. बीडीडी चाळ पुनर्विकास प्रकल्पामुळे वर्षानुवर्षे 160 चौ.फुटांच्या घरामध्ये राहणाऱ्यांना 500 चौ.फुटांचे आलिशान घर मिळणार आहे.

556 घरांचा मार्चमध्ये ताबा

वरळी बीडीडी चाळीतील 556 रहिवाशांना मार्चमध्ये घराचा ताबा मिळणार आहे. तर ना. म. जोशी मार्ग येथे पहिल्या टप्प्यातील सात टॉवरपैकी दोन टॉवरचे काम डिसेंबरपर्यंत पूर्ण होणार आहे. येथील रहिवाशांना जून 2026 पासून टप्प्याटप्प्याने घराचा ताबा मिळणार आहे.