![beed crime](https://www.saamana.com/wp-content/uploads/2025/02/beed-crime-696x447.jpg)
बीडचा बिहारच झाल्याचे कराड गँगने पुन्हा सिद्ध केले. ‘वाल्मीक कराडच्या बातम्या का पाहतोस? तुझा संतोष देशमुख करू!’ असे म्हणत दोन जणांनी एका तरुणाला बेदम मारहाण केली. गंभीर जखमी अवस्थेत त्याला अंबाजोगाईतील स्वाराती रुग्णालयात भरती करण्यात आले. मात्र पुढील उपचारासाठी त्याला लातूर येथे पाठवण्यात आले. मारहाण करणारे दोघेही संतोष देशमुख हत्या प्रकरणात ‘वॉन्टेड’ असलेल्या कृष्णा आंधळेचे मित्र आहेत.
बीड जिल्हय़ात गुंडगिरीने उच्छाद मांडला आहे. राखमाफिया, वाळूमाफिया, औषधमाफिया, जागामाफिया, खंडणीमाफिया असे ‘माफियाराज’ सध्या बीडमध्ये चालू आहे. धारूर पोलीस ठाण्यात होमगार्ड असलेले अशोक मोहिते (30) हे रस्त्याच्या कडेला मोबाईलमध्ये वाल्मीक कराडशी संबंधित बातमी पाहत होते. मोहिते बातम्या पाहत असतानाच अचानक कृष्णा आंधळेचे मित्र वैजिनाथ बांगर आणि अभिषेक सानप हे तिथे आले.
‘वाल्मीक कराडच्या बातम्या का पाहतोस? तुझाही संतोष देशमुख करू!’ असे म्हणत वैजिनाथ आणि अभिषेक या दोघांनी अशोक मोहिते यांना लोखंडी रॉडने मारहाण केली. एवढेच नाही तर त्यांच्यावर कोयत्याने वारही केला.