महाविकास आघाडीची सत्ता असताना 2022 मध्ये तत्कालीन मुख्यमंत्री शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी 500 चौरस फुटांपर्यंतच्या मालमत्तांचा कर माफ केला. यामध्ये जल आणि मलनिःसारण करही माफ करण्यात आला. मात्र आता कर लादून अदानीसाठी जागा रिकाम्या कराव्यात आणि लाडक्या कंत्राटदारांची देणी देण्यासाठी मुंबईकरांवर पुन्हा कर लादण्याचा पालिकेचा डाव आहे. मात्र 500 चौरस फुटांपर्यंतच्या जल, मलनिःसारण कर लावल्यास मुंबईकरांचा उद्रेक होईल, असा इशारा शिवसेना नेते, युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी आज दिला.
मुंबई महानगरपालिकेत गेल्या तीन वर्षांपासून महापौर आणि निवडून आलेले नगरसेवक नसताना मिंधे-भाजप सरकारच्या आशीर्वादाने मनमानीपणे कारभार सुरू असल्याचे आदित्य ठाकरे यांनी आज प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितले. मिंध्यांच्या लाडक्या कंत्राटदारांची देणी भागवण्याच्या ओझ्याखाली असणारी मुंबई महानगरपालिका आता जल आणि मलनिःसारण कराच्या माध्यमातून मुंबईकरांच्या खिशातला पैसा ओरबाडू पाहत आहे. एकीकडे विस्कळीत झालेला पाणी पुरवठा आणि अस्वच्छता असताना पालिकेकडून होणारी करवसुली अन्यायकारक आहे, असे ते म्हणाले.