केंद्र सरकारने विद्यापीठ अनुदान आयोगाच्या नियमांत बदल सुचवले आहेत. पण हे नवीन नियम म्हणजे संघाचा अजेंडा पुढे ढकलण्यासाठी केलेली तरतूद आहे अशी टीका काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी केली आहे. देशावर एक इतिहास, एक भाषा आणि एकच परंपरा लादण्यासाठी हा नियम आणला गेला आहे असेही राहुल गांधी म्हणाले.
द्रमुक पक्षाने या नियमाविरोधात आंदोलन केले. या आंदोलनाला राहुल गांधी यांनी हजेरी लावली. यावेळी राहुल गांधी म्हणाले की हिंदुस्थानातल्या सर्व संस्कृती, इतिहास आणि परंपरा संपण्याचा संघाचा उद्देश आहे. हा नियम या गोष्टीची सुरुवात आबे. संविधानावर हल्ला करणे, एक विचार, एक पंरपरा एक इतिहास आणि एक भाषा लादण्याचे काम संघाकडून सुरू आहे.
केंद्र सरकारवर टीका करताना राहुल गांधी म्हणाले की वेगवेगळ्या राज्यातील शिक्षण पद्धतीत हा प्रकार सुरू आहे. प्रत्येक राज्याचा एक इतिहास आहे, आपली परंपरा आणि भाषा आहे. म्हणून संविधानातच हिंदुस्थानला राज्यांचा संघ म्हटलंय. याचा अर्थ स्पष्ट आहे की या सर्व परंपरा, इतिहास, भाषा मिळून हिंदुस्थानला एका संघराज्याचं रुप देतं. युजीसीच्या नवीन नियमांच्या माध्यमातून संघ सर्व राज्यांचा अपमान करू पाहतंय आणि आपलं अधिपत्य स्थापन करण्याचे त्यांचे मनसुबे आहेत असेही राहुल गांधी म्हणाले.