![aaditya thackeray](https://www.saamana.com/wp-content/uploads/2025/02/Aaditya-Thackeray-1-696x447.jpg)
छत्रपती शिवाजी महाराज यांच्या भव्य अश्वारूढ पुतळ्याची जपानच्या टोकियोमध्ये प्रतिष्ठापना होत असल्याच्या पार्श्वभूमीवर आज वरळीमध्ये शिवरायांच्या पुतळ्याची भव्य मिरवणूक काढण्यात आली. यावेळी ढोल ताशाचा गजर, तुतारीचा निनाद, भगवे झेंडे आणि ‘जय भवानी, जय शिवाजी’, ‘छत्रपती शिवाजी महाराज की जय’च्या जयघोषाने अवघा वरळी परिसर दुमदुमून गेला. या मिरवणुकीत शिवसेना नेते, युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी सहभाग घेतला.
छत्रपती शिवाजी महाराज यांच्या भव्य अश्वारूढ पुतळा सातासमुद्रापार टोकियोमध्ये स्थापित केला जाणार आहे. येत्या 8 मार्च रोजी भव्य सोहळ्यात या पुतळ्याची प्रतिष्ठापना मान्यवरांच्या हस्ते होणार आहे. हिंदुस्थानमधून हा पुतळा जपानला पाठवण्यात येत आहे. या निमित्ताने देशभरात शिवस्वराज्य रथयात्रा काढण्यात येत आहे. ही शिवस्वराज्य रथयात्रा आज वरळीमध्ये दाखल झाल्यानंतर छत्रपतींच्या भव्य अश्वारूढ पुतळ्याची मिरवणूक काढण्यात आली. शिवस्वराज्य रथयात्रेची सुरुवात स्वराज्याची राजधानी सातारा येथून 15 जानेवारी रोजी करण्यात आली आहे.
साताऱयानंतर ही शिवस्वराज्य रथरात्रा कराड, कोल्हापूर, मालवण, निपाणी, चिकोडी, कुरुंदवाड, शिरोळ, मिरज, मंगळवेढा, सोलापूर या ठिकाणी पोहोचली असता तिचे भव्य स्वागत करण्यात आले आहे. ही रथरात्रा आज वरळीत पोहोचल्यानंतर शिवसेना नेते, युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांच्या प्रमुख उपस्थित भव्य मिरवणूक काढण्यात आली. जपानमधील ‘आम्ही पुणेकर’ या ग्रुपतर्फे हा पुतळा उभारण्यात आला आहे. यावेळी आमदार सुनील शिंदे, विभागप्रमुख आशीष चेंबूरकर, माजी महापौर किशोरी पेडणेकर, युवा सेनेचे अभिजित पाटील यांच्यासह मोठय़ा संख्येने शिवसैनिक, पदाधिकारी, महिला रणरागिणी आणि नागरिक उपस्थित होते.
छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा टोकियोमध्ये स्थानापन्न होणार ही आमच्यासाठी अभिमानाची गोष्ट आहे. विशेष म्हणजे वरळीत पुतळा आल्यानंतर मिरवणूक काढण्याची संधी मिळाली हेदेखील आमचे भाग्यच म्हणावे लागेल.- आदित्य ठाकरे, आमदार, युवासेना प्रमुख