![AI (3)](https://www.saamana.com/wp-content/uploads/2025/02/AI-3-696x447.jpg)
>> उज्ज्वल राणे
‘एआय’चं हे दालन समृद्ध होत असतानाच तंत्रज्ञानाची इतर क्षेत्रंही झपाटय़ाने प्रगत होत आहेत. त्यातील खूप महत्त्वाचं ठरू शकणारं तंत्रज्ञान म्हणजे रोबोटिक्स. मानवसदृश रोबोटस्ची निर्मिती आणि विकास जोमानं होत आहे. ‘एआय’ने साकारलेला अवतार जर अशा मानवसदृश रोबोटमध्ये समाविष्ट केला गेला तर त्याला एक नवंच परिमाण प्राप्त होईल. मग हे अवतार केवळ फोन किंवा संगणकाच्या पडद्यापुरतेच मर्यादित न राहता अगदी आपल्या आसपास वावरू लागतील. व्यक्तीच्या अस्तित्वाचा आणखी एक पैलू जिवंत होईल आणि एका अर्थाने अमरत्वदेखील पावेल.
आजकाल फोनवरून किंवा फेसबुकसारख्या माध्यमातून होणारे फसवणुकीचे बरेच प्रकार ऐकू येतात. यातील गुन्हेगार त्यांच्या सावजांना आपण त्यांच्या परिचितांपैकीच कोणीतरी असल्याची बतावणी करतात. कृत्रिम बुद्धिमत्तेच्या म्हणजेच ‘एआय’च्या वापराने अशी सोंगे वठवणे अधिक सोपे होत आहे. याचाच दुसरा प्रकार म्हणजे अपप्रचाराच्या हेतूने एखाद्या व्यक्तीची गैरसमज पसरवणारी चित्रफीत बनवणे. यातही त्या व्यक्तीच्या तोंडी कपोलकल्पित वाक्यं घालण्यासाठी किंवा तिची पार्श्वभूमी किंवा हालचाली कृत्रिमरीत्या बदलण्यासाठी ‘एआय’चा वापर होऊ शकतो. नुकतीच काही राजकीय क्षेत्रातील प्रतिस्पर्धी मंडळी नाताळच्या पारंपरिक वेशात परस्परांना हस्तांदोलन करीत आहेत, शुभेच्छा देत आहेत अशी एक चित्रफीत पाहण्यात आली. त्यातील व्यक्ती पाहू जाता ती खोटी, ‘एआय’ने बनवलेली चित्रफीत होती हे स्पष्टच होते.
परंतु ज्याप्रमाणे कुठल्याही नाण्याला दोन बाजू असतात तशीच ‘एआय’च्या या वापराची एक दुसरी विधायक बाजूही आता पुढे येत आहे. प्रिय व्यक्तीच्या जाण्याने आयुष्यात निर्माण होणारी पोकळी, पदोपदी तिच्या अनुपस्थितीची होणारी बोचरी जाणीव हे मानवी जीवनातलं एक अटळ वास्तव आहे. ‘एआय’चा वापर करून त्या जखमेवर फुंकर घालता येणे आता शक्य होत आहे. स्मार्टफोनमुळे स्थिर व चलचित्रण अगदी सहजसाध्य झालं आहे. ते मुबलक प्रमाणात केलंही जातं. कुठल्याही व्यक्तीच्या अशा चित्रणांचा स्रोत जर ‘एआय’ला उपलब्ध करून दिला तर त्याच्या वापराने कुठल्याही व्यक्तीची एक पडद्यावरची चालती बोलती प्रतिमा तयार करणे सहज शक्य आहे. अशी प्रतिमा किंवा ‘अवतार’ एखाद्या दिवंगत प्रिय व्यक्तीची उणीव अंशतः का होईना, भरून काढू शकते. अशा अवतारांशी फोन किंवा संगणकाच्या पडद्यावर संभाषणही साधता येते. या अवतारात त्या व्यक्तीचा चेहरा-मोहरा, देहयष्टी इत्यादींचा समावेश तर असतोच, पण तिची बोलण्याची लकब, उठण्याबसण्याची ढब, वारंवार वापराने अगदी तिचेच म्हणून लक्षात राहिलेले काही शब्द, त्यांचे उच्चार आणि आवाजाची पट्टी, पोत यांचीही हुबेहूब नक्कल करता येते. यापुढे जाऊन त्या व्यक्तीच्या आयुष्यातील घटना, परिवारातील व्यक्ती, त्यांच्याविषयीच्या राग-लोभ यांसारख्या भावना यांचाही समावेश अवतारात करता येतो.
उदाहरणार्थ, जर एखाद्या नातवाने आपल्या दिवंगत आजीबरोबर ‘‘आजी, तुला क्रिकेट आवडतं का गं? कालची मॅच इतकी मस्त झाली ना!’’ अशी संभाषणाची सुरुवात केली तर ‘‘नाही रे बाबा! माझा जन्म ज्यावेळी कोकणात झाला.’’
(ही ‘एआय’ला पुरवलेली व्यक्तिसापेक्ष माहिती.) ‘‘त्या काळी कुठलं आलंय क्रिकेट नि बिकेट? आम्ही आपले आंबा, फणस, चिंचेच्या झाडांवर चढायचो. सूरपारंब्या खेळायचो’’ (ही ‘एआय’ने त्या काळातील कोकणाविषयी जमवलेली माहिती.)
‘‘त्यामुळे मॅचबीच काही मी पाहत नाही, पण आपण त्या कांगारूंना हरवलं ते ऐकून बरीक आनंद झाला हो!’’ (अद्ययावत घटनांविषयीची आंतरजालावरील माहिती वापरून ‘एआय’ने दिलेली प्रतिक्रिया.) असं अगदी वर्तमानात घडणारं संभाषण रंगू शकतं.
‘एआय’च्या कुठल्याही अंगात होतेय तशीच याही क्षेत्रात झपाटय़ाने प्रगती होणे अपेक्षित आहे. त्यामुळे हे ‘अवतार’ काळाबरोबर अधिकाधिक सफाईदार, मानवसदृश आणि गहिरे होत जाणार यात शंका नाही. या क्षेत्रातील एक अगदी सुरुवातीची ‘यू, ओन्ली व्हर्च्युअल’ ही कंपनी एका आई आणि मुलाच्या जिव्हाळ्याच्या नात्यातून सुरू झाली. एकटय़ा आईने लाडाकोडाने वाढवलेला मुलगा – जस्टिन हॅरिसन – आपली आई आता कर्करोगाने जाणार या जाणिवेने व्याकूळ झाला होता. ती आपल्याबरोबर कायम राहावी म्हणून त्याने त्याच्या आईची अशी भासमान प्रतिमा बनवायला सुरुवात केली. पाच वर्षांच्या कालावधीत 3800 पानं भरून जमलेल्या माहितीचा त्याने या अवतारात समावेश केला. सुरुवातीच्या आवृत्तीत ही ‘आई’ केवळ टाईप केलेल्या वाक्यांना तसाच प्रतिसाद देई. मग हळूहळू ती बोलूही लागली. या ‘आई’मध्ये जस्टिनच्या आईचे विचार, मतं, प्राथमिकता यांचाही समावेश केला गेला होता. त्यामुळे मुलाने जेव्हा त्याला खुपणारा एक प्रश्न विचारला की, ‘‘आई, तू आजारी असताना मला कामानिमित्त बाहेरगावी जावं लागलं याचं तुला वाईट वाटलं का गं?’’
यावर त्या आईचं उत्तर ‘‘नाही रे राजा! हा प्रकल्प म्हणजे तुझं स्वप्न होतं. त्यासाठी तू इतकी मेहनत घेतली होतीस. त्यामुळे तू ते समरसून करावंस याचा मला आनंदच आहे!’’ हे उत्तर ऐकून जस्टिनच का, आपल्याही डोळ्यांत पाणी तरळतं.
जस्टिनच्या आईची आणि तिच्या मायेखातर त्याने उभारलेल्या कंपनीची ही कथा वाचताना मी व्यक्तिशः एका विलक्षण योगायोगाने थक्क झालो. 2022 सालच्या ऑक्टोबर 14,15,16 या तारखांना मराठी विज्ञान परिषदेने एक विज्ञान कथा लेखन शिबीर आयोजित केले होते. शिबिरासाठी पूर्वअट म्हणून एक विज्ञान कथा लिहून आणणे बंधनकारक होते. मी त्यासाठी सप्टेंबरमध्ये ‘एआय’वर आधारित एक काल्पनिक कथा लिहायला घेतली व शिबिरात सादर केली. तीही आई आणि मुलाच्या जिव्हाळ्यातून जन्माला आलेल्या अशा अवतारावरच आधारित होती. दरम्यान, जगाच्या दुसऱ्या टोकाला एक मुलगा आपल्या आईसाठी असं काहीतरी प्रत्यक्ष करण्याच्या विचारात होता. म्हणजे जी काल्पनिक कथा लिहिली, ती अवघ्या काही महिन्यांतच वास्तवात उतरू लागली. यापुढची गोष्ट म्हणजे 17 ऑक्टोबरला म्हणजे शिबीर संपायच्या दुसऱ्या दिवशी जस्टिनच्या आईचे निधन झाले आणि ‘यू, ओन्ली व्हर्च्युअल’चा प्रवास सुरू झाला. मग दीड महिन्यातच म्हणजे नोव्हेंबर 2022 च्या अखेरीस चॅट जीपीटीचा शुभारंभ झाला आणि ‘एआय’ जनमानसात विराजमान झाली.
‘एआय’चं हे दालन समृद्ध होत असतानाच तंत्रज्ञानाची इतर क्षेत्रंही झपाटय़ाने प्रगत होत आहेत. त्यातील खूप महत्त्वाचं ठरू शकणारं तंत्रज्ञान म्हणजे रोबोटिक्स. मानवसदृश रोबोटस्ची निर्मिती आणि विकास जोमानं होत आहे. ‘एआय’ने साकारलेला अवतार जर अशा मानवसदृश रोबोटमध्ये समाविष्ट केला गेला तर त्याला एक नवंच परिमाण प्राप्त होईल. मग हे अवतार केवळ फोन किंवा संगणकाच्या पडद्यापुरतेच मर्यादित न राहता अगदी आपल्या आसपास वावरू लागतील. व्यक्तीच्या अस्तित्वाचा आणखी एक पैलू जिवंत होईल आणि एका अर्थाने अमरत्वदेखील पावेल.
खरेच, आपण सारे तंत्रज्ञानाच्या एका स्तिमित करणाऱ्या युगात जगत आहोत.
(लेखक तंत्रज्ञान विषयाचे तज्ञ आहेत.)