दिल्ली विधानसभा निवडणुकीचे मतदान झाले असून आता शनिवारी निकालही जाहीर होणार आहे. मात्र, निकाल जाहीर होण्याआधी आपचे खासदार संजय सिंह यांनी खळहळजनक आरोप केला आहे. भाजपचे दिल्लीत ‘ऑपरेशन लोटस’ सुरू झाले आहे. त्यासाठी ते आमच्या आमदारांना 15 कोटींची ऑफर देत असल्याचा खळबळजनक आरोपही संजय सिंह यांनी केला आहे.
या निवडणुकीत भाजपचा दारुण पराभव होणार, हे निश्चित आहे. मात्र, भाजपने निकालपूर्वीच आपला पराभन स्वीकारला आहे. त्यासाठी त्यांनी आता दिल्लीत ऑपरेशन लोटस सुरू केले आहे. त्यांनी आमचे खासदार विकत घेण्याचा प्रयत्न चालवला आहे. आमच्या आमदारांना भाजपकडे वळवण्यासाठी ते तपास संस्था आणि पैशांचा वापर करत आहेत. त्यांच्या धनशक्ती आणि तपास संस्थाशी संघर्ष करत आम्ही आमचा पक्ष आणि दिल्ली वाचवली आहे. भाजपचे हे ऑपरेशन लोटस यशस्वी होणार नाही, असेही ते म्हणाले.
आमच्या अनेक आमदारांनी आम्हाला सांगितले की, आमच्या सात आमदारांना पक्ष सोडण्यासाठी, पक्ष तोडण्यासाठी आणि भाजपमध्ये दाखल होण्यासाठी प्रत्येकी 15 कोटी रुपयांची ऑफर देण्यात आली आहे. आम आदमी पक्ष फोडून सरकार स्थापन करण्यासाठी ते प्रयत्न करत आहेत. आम्ही निवडणूक लढवणाऱ्या आमच्या सर्व आमदारांना त्यांना येणारे सर्व कॉल रेकॉर्ड करण्यास सांगितले आहे. याबाबत तक्रार दाखल केली जाईल. जर कोणी तुम्हाला भेटले आणि ऑफर दिली तर छुप्या कॅमेऱ्याचा वापर करून त्याचा व्हिडिओ बनवा. त्याची माहिती माध्यमांना आणि नंतर सर्वांना दिली जाईल. आम्ही आमच्या आमदारांना सावध केले आहे, असेही संजय सिंह म्हणाले.
दोन गोष्टी अगदी स्पष्ट आहेत. मतमोजणी आणि निकालापूर्वीच भाजपने आपला पराभव स्वीकारला आहे. त्यांचा दारुण पराभव होत आहे. दुसरी बाब म्हणजे देशभरात ते ज्या पद्धतीने घोडेबाजार करतात, ते आता दिल्लीतही सुरू झाले आहे. कधीकधी ते त्याला ऑपरेशन लोटस आणि इतर अनेक नावे देतात. आमदारांना फोडण्यासाठी ते पैसे आणि तपास संस्थांचा वापर करत दबाव निर्माण करत आहेत, असा आरोपही संजय सिंह यांनी केला.