हिंदुस्थानींना साखळदंड, बेड्या घालून आणलं! परराष्ट्रमंत्र्यांकडून सारवासारव, दिलेलं कारण पटतंय का?

अमेरिकेचे राष्ट्रध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी अवैध स्थलांतरीतांविरोधात कठोर कारवाई केली आहे. हिंदुस्थानातील 7.50 लाख नागरिक अवैध पद्धतीने अमेरिकेत राहत असल्याने दिसून आले आहे. अमेरिकेतील 104 हिंदुस्थानींची पहिली तुकडी बुधवारी अमृसर येथे पाठवण्यात आली. त्यांच्या हातात बेड्या आणि पायात साखळदंड होते. त्यांना अशा अपमानास्पद पद्धतीने हिंदुस्थानात पाठवल्याबाबत देशात संतापाची लाट उसळली आहे. आता परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी याबाबत सारवासरव करत स्पष्टीकरण दिले आहे. मात्र, त्यांचे हे स्पष्टीकरण पटण्यासारखे आहे काय? असा संतप्त सवाल जनतेतून करण्यात येत आहे.

अमेरिकेत अवैधपणे वास्तव्य करणाऱ्या हिंदुस्थानींना परत पाठवताना अमेरिकेकडून त्यांना अपमानास्पद वागणूक देण्यात आली. त्यांच्या हातात बेड्या आणि पायात साखळदंड होते. या अपमानास्पद वागणुकीमुळे देशभरात संताप व्यक्त होत आहे. संसदेत विरोधकांनी मोदी सरकार जोगे व्हा, हिंदुस्थानींचा अपमान सहन करणार नाही, अशी घोषणाबाजी करत मोदी सरकारविरोधात निदर्शने केली. विरोधकांच्या आक्रमक भूमिकेनंतर परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी यावर स्पष्टीकरण देत सारवासारव करण्याचा प्रयत्न केला आहे.

एस. जयशंकर राज्यसभेत म्हणाले की, आपले नागरिक जर परदेशात अवैधपणे राहत असल्याचे दिसून आले तर त्यांना परत पाठवण्याची कारवाई करण्यात येते. त्यांना आपल्या देशात स्वीकारणे ही आपल्या देशाची जबाबदारी आहे. अमेरिकेमध्ये अशा बेकायदेशीररीत्या वास्तव्य करणाऱ्या लोकांना माघारी पाठवण्याची प्रक्रिया तेथील इमिग्रेशन आणि कस्टम्स एन्फोर्समेंट ऑथॉरिटी करते. 2012 पासून लागू झालेल्या एका नियमानुसार जेव्हा अशा अवैध स्थलांतरीतांना माघारी पाठवण्यात येतं, तेव्हा त्यांना सुरक्षेच्या दृष्टीकोनातून बांधून ठेवण्यात येतं. यात फक्त महिला आणि मुलांना सवलत असते. त्यांना बांधून ठेवलं जात नाही. अमेरिकेतून परत पाठवल्या जाणाऱ्या हिंदुस्थानींसोबत कुठल्याही प्रकारचा दुर्व्यवहार होऊ नये, त्यांचा अपमान होऊ नये, त्यांना सन्मापूर्वक परत पाठवण्यात यावे, यासाठी आम्ही अमेरिकी सरकारसोबत चर्चा करत आहोत, असे जयशंकर यांनी सांगितले.