महायुती सरकारला डिप्रेशन आले आहे. हा अधिक गंभीर आजार असून बहुमताच्या डिप्रेशनमधून सरकार बाहेर पडायला तयार नाही. हे बहुमत चुकीच्या पद्धतीने मिळवले आहे. त्यातून मिळालेला विजय आणि त्या विजयाचा धक्का पचवता न आल्याने आलेले हे डिप्रेशन आहे, असा हल्लाबोल शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते, खासदार संजय राऊत यांनी केला. मंत्री संजय शिरसाट यांच्या टीकेला ते उत्तर देत होते.
मी काय बोललो आहे हे समजण्यासाठी माणसाने आधी साक्षर असावे लागते. मला प्रश्न विचारला तेव्हा देवेंद्र फडणवीस हे वर्षा बंगल्यावर राहायला का जात नाहीत? असे मी विचारले होते. त्या संदर्भात माझ्याकडे जी माहिती होती, ती मी दिली. लोकशाहीनुसार त्याच्यावर तुम्ही प्रत्युत्तर द्या ना, असे राऊत म्हणाले.
मुळात आपण कामाख्याला जाऊन अघोरी विधी केलेत की नाही, यावर कुणीही उत्तर देत नाही. अघोरी विद्या अंधश्रद्धेच्या कायद्याच्या विरोधामध्ये असतानासुद्धा अशा प्रकारे राजकारणामध्ये कुणी काम करत असेल, तर ते महाराष्ट्राच्या पुरोगामी संस्कृतीला आणि परंपरेला शोभणारे नाही, असे मी म्हणत असेल आणि मला वेडे ठरवत असेल तर… लोकांनी महात्मा फुले आणि गाडगे महाराज यांनाही वेडे ठरवले होते. त्यामुळे हे पुरोगामी लोक नाही. यांना जादूटोणा मंत्र याच्यात विश्वास आहे, या माध्यमातून जिंकलो असा आत्मविश्वास आहे त्यांना आहे. पण देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री असून आम्हाला त्यांची, त्यांच्या कुटुंबाची चिंता आहे. पण कुणीतरी त्यांना रोखण्याचा प्रयत्न करत आहे. ही आमची चिंता असून शिरसाट यांना विजयाचे डिप्रेशन आहे. कारण हा विजय सरळ नाही, असेही राऊत म्हणाले.
दरम्यान, वाल्मीक कराड याचा व्हिडीओ पाहिला म्हणून बीडच्या धारूर येथे एका तरुणाला बेदम मारहाण करण्यात आली. विशेष म्हणजे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे बीडमध्येच होते आणि त्यांची पाठ वळताच हा प्रकार घडला. याबाबत विचारले असता राऊत म्हणाले की, बीडमध्ये फडणवीस यांनी मी खपवून घेणार नाही, सहन करणार नाही, कायदा हातात घेणाऱ्यांना वठणीवर आणणार असे म्हटले. आता सुरेश धस यांनी हा मुद्दाही त्यांच्यापर्यंत न्यावा. फडणवीस बाहुबली मुख्यमंत्री आहेत धस म्हणतात. आता बाहुबलींनी एका सामान्य माणसावर झालेल्या हल्ल्याचा मुद्दा मार्गी लावावा.