महाराष्ट्राच्या दैवतांचा अपमान करणं संघाचा जुना अजेंडा, सोलापूरकरांच्या वक्तव्यावर संजय राऊत यांचा संताप

छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य करणारा अभिनेता राहुल सोलापूरकरविरोधात राज्यभरात प्रचंड संताप व्यक्त होत आहे. शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते, खासदार संजय राऊत यांनीही यावर परखड शब्दात भाष्य केले. महाराष्ट्राच्या दैवतांचा अपमान करणे हा संघाचा जुना अजेंडा आहे, अशी टीका राऊत यांनी केली. ते दिल्लीत माध्यमांशी संवाद साधत होते.

महाराष्ट्राच्या दैवतांचा अपमान करणे हा संघाचा जुना अजेंडा आहे. ते कधी वीर सावरकरांवर घसरतील, तर कधी महात्मा गांधींवर घसरतील… आता तर छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराजांवर घसरायला लागले आहेत. अनेक प्रकारचे विकृत चित्रपट निर्माण करून संभाजी राजेंचे विकृत चित्रणही करण्यात आले. सरकार काय करतंय? खरे तर सरकारने चिरडून मरावे अशी परिस्थिती आहे, असा खरपूस टीकाही राऊत यांनी केली.

महापुरुषांबद्दल अशी वक्तव्ये करणाऱ्यांना दिसेल तिथे ठेचले पाहिजे, गाडले पाहिजे. गोळ्या घातल्या पाहिजेत असा संताप, छत्रपतींचे वंशज खासदार उदयन राजे यांनी व्यक्त केला. याबाबत विचारले असता राऊत म्हणाले की, त्यांनी स्वत:च याची पूर्तता करावी. कोल्हापूरचे महाराज असतील किंवा सातारचे, आम्ही त्यांचे मार्गदर्शन नेहमी घेतो. आम्ही त्यांचा संताप समजू शकतो. ते राजे असून आम्ही छत्रपती शिवाजी महाराजांची प्रजा आहोत. आम्हाला अधिक तळमळ, तिडीक आहे.

दिसेल तिथे ठेचा, गाडा नाहीतर गोळ्या घाला! उदयनराजेंची उघड धमकी, सोलापूरकरच्या सुरक्षेत वाढ

यावेळी संजय राऊत यांनी संजय शिरसाट यांच्या विधानाचाही समाचार घेतला. आम्ही प्रयागराजला जाणार आहोत. मात्र रेडे कापायला कामाख्याला जाणार नाहीत. आम्ही श्रद्धावान हिंदू आहोत. श्रद्धेत आणि हिंदुत्वात गद्दारी, बेइमानीला स्थान नाही. महायुतीच्या राज्यात छत्रपती शिवाजी महाराज औरंगजेबाला लाच देऊन सुटले असे सांगणारे लोक खुलेआम वावरत आहेत. सरकार काय करतंय? असा सवाल राऊत यांनी केला.