![neehar (9)](https://www.saamana.com/wp-content/uploads/2025/02/neehar-9-696x447.jpg)
रजोनिवृत्ती प्रत्येक स्त्रीच्या आयुष्यातील एक महत्त्वाचा टप्पा. पाळी येताना जशी काळजी घ्यावी लागते. तसेच पाळीला निरोप देतानाही अनेक गोष्टींची काळजी घ्यावी लागते. पाळीला निरोप देताना शरीरात अनेक बदल होत असतात. त्या बदलांना कसे सामोरे जाल काय खाल याकरता काही टिप्स.
रजोनिवृत्ती दरम्यान हार्मोनल बदलांमुळे हाडे कमजोर होऊ शकतात आणि ऑस्टिओपोरोसिस होण्याचा धोका वाढतो. त्यामुळेच आपल्या आहारामध्ये दही, दूध आणि चीज यासारख्या दुग्धजन्य पदार्थांचा समावेश करणे हे हितावह आहे. खासकरून रजोनिवृत्तीच्या आधीच हे पदार्थ खायला सुरुवात करा.
हिरव्या भाज्यांमध्ये कॅल्शियमचा मुबलक साठा असतो. याव्यतिरिक्त चांगल्या प्रतीचे धान्य, फळांचा रस आहारात समाविष्ट करणे खूप गरजेचे आहे.
सूर्यप्रकाशाच्या माध्यमातून व्हिटॅमिन डी आपल्याला मिळते. त्यामुळे कोवळ्या उन्हात बसणे अतिशय उत्तम. आहारामध्ये मासे, अंडी, व्हिटॅमिन डी हे खूप महत्त्वाचे आहे.
रजोनिवृत्ती दरम्यान उद्भवणार्या हाडांचे नुकसान टाळण्यासाठी कॅल्शियम आणि व्हिटॅमिन डी असलेले पदार्थ आहारात समाविष्ट करणे गरजेचे आहे.
रजोनिवृत्ती कालखंडात वजन वाढणे सामान्य गोष्ट आहे. बदलते हार्मोन्स, वाढते वय, जीवनशैली आणि अनुवंशिकता यामुळे वजनामध्ये झपाट्याने वाढ होऊ शकते. त्यामुळेच हृदयरोग आणि मधुमेह सारख्या आजारांचा धोका संभवतो.
रजोनिवृत्तीच्या दरम्यान आहारामध्ये भाज्यांचा समावेश मोठ्या प्रमाणावर करायलाच हवा. फळे आणि भाज्यांमध्ये कॅलरी कमी असते. त्यामुळे वजन फारसे वाढत नाही.
रजोनिवृत्तीनंतर सर्वात महत्त्वाचा धोका असतो तो म्हणजे हृदयरोगाचा.. त्यामुळेच रोज चालणे तसेच आरोग्य तपासणी करुन घेणे खूप गरजेचे आहे.
नियमित व्यायामामुळे रजोनिवृत्तीची लक्षणे जसे की कमी झोप, चिंता आणि थकवा दूर होण्यास मदत होते. त्यामुळे रजोनिवृत्तीच्या उंबरठ्यावर असाल तर टेन्शन घेऊ नका. आहाराकडे प्राधान्याने लक्ष द्या.
(कोणतेही वैद्यकीय उपाय घरी करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.)