![delhi voting 2025](https://www.saamana.com/wp-content/uploads/2025/02/delhi-voting-2025-696x447.jpg)
दिल्ली विधानसभेच्या 70 जागांसाठी 60.39 टक्के मतदान झाले. मतदानादरम्यान ‘आप’ आणि भाजप समर्थकांमध्ये काही ठिकाणी हाणामारीच्या घटना घडल्या. आप, भाजप आणि काँग्रेस अशी तिरंगी लढत रंगली. मात्र ही लढत एकतर्फी व्हावी यासाठी भाजपने दिल्लीत ‘महाराष्ट्र पॅटर्न’ राबवत मतदारांवर अक्षरशः पैशांची खैरात केली. नॉर्थ अव्हेन्यू एन ब्लॉकमध्ये दोन ते तीन हजार रुपये वाटण्यात आल्याचा आणि निवडणूक आयोगाच्या नाकाखाली हे सर्व घडत असून पोलीसही त्यासाठी मदत करत असल्याचा आरोप आपने केला. दरम्यान, दिल्ली कोणाची याचा फैसला शनिवारी होणार आहे.
राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, उपराज्यपाल व्ही. के. सक्सेना, परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर, मुख्यमंत्री अतिशी आणि राहुल गांधी तसेच सोनिया गांधी, अरविंद केजरीवाल यांनी आज दिल्ली विधानसभा निवडणुकीसाठी मतदान केले. केजरीवाल यांच्या पालकांनी व्हीलचेअरवर येऊन मतदानाचा हक्क बजावला.
एक्झिट पोल भाजपच्या बाजूने‘आप’ला फटका बसण्याचा अंदाज
मतदान संपल्यानंतर एक्झिट पोल समोर आले. यात 9 एक्झिट पोलनी भाजपला बहुमत तर 2 मध्ये आम आदमी पार्टीचे सरकार बनेल असा अंदाज वर्तवला. ‘पोल ऑफ पोल्स’मध्ये भाजपला 39, ‘आप’ला 30 आणि काँग्रेसला एक जागा मिळेल असे भाकीत वर्तवले. जेव्हीसी आणि पोल डायरीने इतर पक्षांना प्रत्येकी 1 जागा मिळेल अशी शक्यता वर्तवली. जर भाजपला बहुमत मिळाले तर 27 वर्षांनंतर भाजप पुन्हा सत्तेत येईल. यापूर्वी भाजपने 49 जागा जिंकल्या होत्या आणि 5 वर्षांत पक्षाचे 3 मुख्यमंत्री बनले होते. मदनलाल खुराना, साहिब सिंह वर्मा आणि सुषमा स्वराज हे मुख्यमंत्री झाले होते.
गेल्या तीन निवडणुकांच्या तुलनेत कमी मतदान
दिल्ली विधानसभेसाठी गेल्या 3 निवडणुकांच्या तुलनेत यावेळी कमी मतदान झाले. 2013 मध्ये 65.63 टक्के, 2015 मध्ये 67.12 टक्के आणि 2020 मध्ये 62.59 टक्के मतदान झाले होते. तिन्ही वेळेला आपचे सरकार बनले. यावेळी 60.39 टक्के मतदान झाले.
निवडणूक आचारसंहितेत प्रचारकी फलक झाकून ठेवले जातात. मात्र दिल्लीत त्याला हरताळ फासला गेला. मतदानादिवशीही भाजपचे बॅनर, होर्डिंग सर्वत्र झळकत होते. मतदान केंद्रांबाहेरील बूथ तर भगवेमय होते. जय श्रीरामचा उल्लेख असलेल्या भगव्या पताकाही लावल्या होत्या.
मतदानाच्या दिवशीच मोदींचे गंगास्नान
दिल्लीत मतदान सुरू असतानाच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बुधवारी प्रयागराज येथे महाकुंभमेळ्यात जाऊन मंत्रोच्चारात गंगास्नान केले. भगवे वस्त्र आणि रुद्राक्षांच्या माळा घालून मोदींनी संगमावर डुबकी मारली. सूर्याला अर्घ्य देऊन त्यांनी गंगेला दूध, साडी अर्पण केली आणि त्यानंतर पूजा केली. अमृतस्नानाने मला अपार शांती आणि समाधान लाभले, अशा भावना मोदींनी व्यक्त केल्या. सुमारे दोन तास मोदी प्रयागराजमध्ये होते.
प्रयागराज महाकुंभ में आज पवित्र संगम में स्नान के बाद पूजा-अर्चना का परम सौभाग्य मिला। मां गंगा का आशीर्वाद पाकर मन को असीम शांति और संतोष मिला है। उनसे समस्त देशवासियों की सुख-समृद्धि, आरोग्य और कल्याण की कामना की। हर-हर गंगे! pic.twitter.com/ggovSSvhbF
— Narendra Modi (@narendramodi) February 5, 2025