मी तुझ्या बापाचाही मित्र होतो, तू काय सांगतो, मी तुला कित्येक वेळा फिरायला घेऊन गेलो आहे. गप्प बस, गप्प बस अशा शब्दांत काँग्रेसचे अध्यक्ष आणि राज्यसभेतील विरोधी पक्षनेते मल्लिकार्जुन खरगे खासदार नीरज शेखर यांच्यावर संतापल्याचे दिसले. डॉलरच्या तुलनेत रुपयाच्या घसरत्या मूल्याबद्दल खरगे सभागृहात बोलत होते. त्या वेळी नीरज शेखर यांनी सातत्याने त्यांच्या भाषणात व्यत्यय आणल्याने खरगे यांचा पारा चढला.
नीरज शेख सातत्याने व्यत्यय आणत असल्याने खरगे यांनी संतापून त्यांना खाली बसण्यास सांगितले. नीरज हे देशाचे माजी पंतप्रधान चंद्रशेखर यांचे पुत्र आहेत. चंद्रशेखर हे ऑक्टोबर 1990 ते जून 1991 असे सहा महिने देशाचे पंतप्रधान होते. खरगे पुढे म्हणाले, मला आणि दिवंगत माजी पंतप्रधान चंद्रशेखर यांना एकत्र अटक करण्यात आली होती. म्हणून म्हणालो की, तुझा बाप आणि मी मित्र होतो असे खरगे म्हणाले. दरम्यान, नीरज शेखर हे भाजपचे नेते असून ते समाजवादी पक्षाकडून 2 वेळा लोकसभेचे आणि एकदा राज्यसभेचे खासदार होते. 2019मध्ये त्यांनी भारतीय जनता पक्षात प्रवेश केला आणि पुन्हा एकदा राज्यसभेचे खासदार झाले.
शब्द मागे घेण्याची सभापतींची विनंती
खरगे यांनी नीरज शेखर यांना संतापून खाली बसण्यास सांगितल्यानंतर राज्यसभेत भाजप खासदारांनी एकच गदारोळ केला. त्यामुळे विरोधकही भिडले. यावर राज्यसभा सभापती जगदीप धनखड यांनी सत्ताधाऱयांसह विरोधकांना शांत राहण्याचे आवाहन केले. तसेच सभापतींनी खरगे यांना त्यांच्या भाषणातील माजी पंतप्रधानांबद्दलचा उल्लेख मागे घेण्याची विनंती केली. यावर कोणाचाही अपमान करणे माझी सवय नाही, असे खरगे म्हणाले. तसेच पुंभमेळ्यातील चेंगराचेंगरीत हजारो लोकांचा बळी गेला असून सरकारने मृतांची खरी आकडेवारी सांगावी, असेही ते म्हणाले.