बीडमधील घटनांमागचा अन्वय आणि अर्थ- फडणवीसांनी दिली धस यांना भगीरथाची उपमा, देवाभाऊ बाहुबली तर पंकजाताई शिवगामिनी!

सुरेश धस हे आधुनिक भगीरथ असून ते एकदा मागे लागले तर डोकं खाऊन टाकतात. मराठवाड्याचा पाणी प्रश्न सोडवण्यासाठी त्यांनी मेहनत घेतली, असे सांगत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी सुरेश धस यांचे कौतुक केले. यामुळे बीडमधील घटनांमागचा अन्वय आणि अर्थ लपून राहिल्याची राजकीय वर्तुळात उलटसुलट चर्चा आहे. दरम्यान देवाभाऊ बाहुबली तर मी शिवगामिनी असे जाहीरपणे सांगत पंकजा मुंडे यांनी धस यांना टोला लगावला आहे.

बीडमधील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणाचा विषय आमदार सुरेश धस यांनी लावून धरला आहे. या प्रकरणात मंत्री धनंजय मुंडे यांचा राजीनामा घेण्यात यावा यासाठी ते आग्रही आहेत. देशमुख हत्या प्रकरणानंतर फडणवीस यांनी आज पहिल्यांदाच बीडच्या आष्टीमध्ये जाहीर कार्यक्रमात उपस्थिती लावत सुरेश धस यांचे ‘आधुनिक भगीरथ’ असा उल्लेख केला. तर धस यांनी फडणवीसांचा उल्लेख ‘देवेंद्र बाहुबली’ असा करतानाच बाकी कोणाकडून अपेक्षा नाही, पण फडणवीसांकडून अपेक्षा असल्याचे जाहीरपणे सांगितले.

 राख, वाळू माफियांना मोक्का लावा – धस

ठराविक राजकारण्यांनी गुंडगिरीला पाठबळ दिल्यामुळे जिल्ह्याची बदनामी झाली होती. मात्र संतोष देशमुख प्रकरणात मुख्यमंत्र्यांनी कणखर भूमिका घेतली. त्यांनी घेतलेली भूमिका सर्वांना आवडली. या प्रकरणात कोणाला सोडणार नाही, या वक्तव्यावर सर्व जनतेचा विश्वास असल्याचे सांगत धस यांनी राख, वाळू भूमाफिया यांनासुद्धा मकोका लावला पाहिजे, अशी मागणी केली.

मी फडणवीसांची लाडकी

पंकजा मुंडे म्हणाल्या, ते बाहुबली तर मी शिवगामिनी आहे. मुख्यमंत्री म्हणून ते तुम्हाला बाहुबली म्हणतात, ते काही वर्षांपूर्वी मला शिवगामिनी म्हणत होते. माझे वचनच माझे शासन आहे. मी गोपीनाथ मुंडेंची लेक आहे, बोलणे एक आणि करणे एक माझ्या रक्तात नाही. मी फडणवीसांची लाडकी म्हणून त्यांच्या हेलिकॉप्टरमधून आले, असा टोला पंकजा मुंडे यांनी या वेळी लगावला.

आपण नवा बीड घडवू

संतोष देशमुख यांच्या हत्येची घटना अतिशय दुर्दैवी आहे. अशा घटना खपवून घेतल्या जाणार नाहीत. या प्रकरणामागे कोणीही असो, प्रत्येकावर कारवाई केली जाईल, असा विश्वास मी तुम्हाला देतो. आपण छत्रपती शिवरायांचे मावळे आहोत, शिवरायांनी अठरापगड जातींना एकत्र करून स्वराज्याची निर्मिर्ती केली. त्याप्रमाणेच सर्वांना एकत्रित घेऊन आपल्याला इथे नांदायचे आहे व नवीन बीड आपण घडवू, असे फडणवीस म्हणाले.