बेकायदा हिंदुस्थानींना घेऊन अमेरिकी विमान आले, सर्वाधिक घुसखोर गुजरात आणि हरयाणाचे;  महाराष्ट्राचे तिघेजण

बेकायदा हिंदुस्थानींना घेऊन निघालेले अमेरिकेचे लष्करी विमान अखेर आज दुपारी अमृसरच्या श्री गुरू रामदास जी आंतरराष्ट्रीय विमानतळावर दाखल झाले. विमानात एकूण 104 प्रवाशी होते. या प्रवाशांमध्ये सर्वाधिक घुसखोर गुजरात आणि हरयाणाचे होते, तर महाराष्ट्राच्या तीन प्रवाशांचा समावेश होता. सर्वांना जणू ते अट्टल गुन्हेगार असल्याप्रमाणे बेड्या घालून अतिशय कडेकोट बंदोबस्तात हिंदुस्थानात आणण्यात आले. विमानतळावर कडक पोलीस बंदोबस्त होता. बॅरिकेड्स लावण्यात आले होते. विमानतळावरून बाहेर येताच अनेक प्रवाशी घुसखोर म्हणून अमेरिकेने परत पाठवणी केल्याने भावनाविवश झाल्याचे दिसले.

अमेरिकेने परत पाठवलेल्या बेकायदा हिंदुस्थानींमध्ये 30 जण पंजाबचे असून प्रत्येकी 33 जण हरयाणा आणि गुजरातचे आहेत. तर प्रत्येकी 3 जण महाराष्ट्र आणि उत्तर प्रदेशचे आणि दोघे चंदीगडचे असल्याची माहिती सूत्रांनी दिली. अमेरिकी लष्कराचे सी-17 हे विमान 205 बेकायदा हिंदुस्थानींना घेऊन निघाल्याचे सांगण्यात आले होते. विमान आज दुपारी 1 वाजून 55 मिनिटांनी अमृतसर येथील विमानतळावर दाखल झाले. सुरक्षा अधिकाऱ्यांनी या प्रवाशांची कसून तपासणी केली. इमिग्रेशन आणि कस्टमने परवानगी दिल्यानंतर प्रवाशांना पंजाब पोलिसांकडे सोपवण्यात आले. त्यानंतर जवळपास 3 तासांनंतर अमेरिकेचे लष्करी विमान परतले. त्यानंतर पंजाब पोलिसांनी सर्व प्रवाशांना घरी पाठवले.

अमेरिकेत बेकायदेशीर वास्तव्य करणाऱ्यांची ट्रम्प सरकारकडून त्या त्या देशात परतपाठवणी केली जात आहे. त्यात अमेरिकी हवाईदलाचे विमान 104 हिंदुस्थानींना घेऊन बुधवारी अमृतसर विमानतळावर उतरले. एकूण 205 हिंदुस्थानींना बेकायदेशीर ठरवण्यात आले असून त्यातील उर्वरित लोक कुठे आहेत, याबाबत अद्याप कोणतीही माहिती देण्यात आलेली नाही.

बेकायदा हिंदुस्थानींमध्ये संतापाचे वातावरण

प्रवाशांनी विमानतळाबाहेर येताच अमेरिकेच्या धोरणावर कडाडून टीका केली. आम्ही अमेरिकेच्या अर्थकारणात मोलाचे योगदान दिले. त्यामुळे आम्हाला अमेरिकेचे नागरिकत्व मिळायलाच हवे होते, अशी भावना अनेकांनी व्यक्त केल्याचे पंजाबचे पोलीस महासंचालक गौरव यादव यांनी सांगितले.

अमेरिकेने अमानुष वागणूक दिली

अमेरिकेने बेकायदा स्थलांतरित हिंदुस्थानींना एखाद्या गुन्हेगाराप्रमाणे बेड्या घालून आणले. अशा प्रकारे अमेरिकेने आपल्या लोकांचा केलेला अपमान अतिशय निंदनीय आहे, अशा शब्दांत काँग्रेसने एक्सवरून संताप व्यक्त केला. आपल्या लोकांना हिंदुस्थान सरकारने सन्मानाने हिंदुस्थानात आणण्यासाठी ट्रम्प सरकारशी चर्चा करायला हवी होती. आज ज्याप्रकारे त्यांनी हिंदुस्थानी नागरिकांना वागणूक दिली ते अतिशय निंदनीय आणि अपमानजनक असल्याचे काँग्रेसने म्हटले आहे.