National Games: महाराष्ट्राचा रौप्य महोत्सवच कायम, सुवर्ण पदकांच्या शर्यतीत महाराष्ट्राची चौथ्या स्थानावर घसरगुंडी

>> विठ्ठल देवकाते

गत राष्ट्रीय स्पर्धेत अव्वल स्थानी राहिलेल्या महाराष्ट्राची यंदा सुवर्ण कमाईत प्रचंड पीछेहाट झाली असून राज्यातील खेळाडूंचा केवळ रौप्य महोत्सवच कायम राहिला आहे. महाराष्ट्राने आतापर्यंत सर्वाधिक 35 रौप्य जिंकले असले तरी सुवर्ण पदकांचा आकडा मंगळवारच्या 16 वरच अडकला आहे. त्यामुळे 38 व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत महाराष्ट्राची तिसऱयावरून चौथ्या क्रमांकावर घसरण झाली आहे. दुसरीकडे कर्नाटकने आपली जोरदार सुवर्ण कमाई कायम राखत 28 आकडा गाठला आहे.

रोईंगमध्ये मृण्मयीला रौप्य

डेहराडून – महाराष्ट्राच्या मृण्मयी साळगावकरने 38 व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत रौप्य पदक तर गुरप्रताप सिंग याने कास्य पदक जिंकून रोईंग स्पर्धेतील सलामीच्या दिवशी शानदार कामगिरी केली. नाशिकच्या मृण्मयीने सिंगल स्कल प्रकारातील दोन किलोमीटर अंतराच्या शर्यतीत रुपेरी कामगिरी केली. तिला हे अंतर पार करण्यास 8 मिनिटे 47.6 सेकंद वेळ लागला. मध्य प्रदेशच्या खुशप्रीत कौर हिने हे अंतर 8 मिनिटे 40.3 सेकंदांत पार करीत सुवर्ण पदक जिंकले. पुरुषांच्या सिंगल स्कल प्रकारात महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करणारा आर्मी रोईंग सेंटरचा खेळाडू गुरप्रताप सिंग याने दोन किलोमीटरचे अंतर 8 मिनिटे 4 सेकंदांत पार केले. सेनादलाचा बलराज पन्वर (7 मिनिटे 26.6 सेपंद) व उत्तराखंडचा नवदीप सिंग (7 मिनिटे 41.10 सेकंद) यांनी अनुक्रमे सुवर्ण व रौप्य पदक पटकाविले.

सायकलिंगमध्ये महाराष्ट्राचा दुहेरी धमाका

रुद्रपूर – महाराष्ट्राने सायकलिंगमधील पदकांची मालिका कायम राखताना आज महिला गटात एक रौप्य आणि एक कांस्य पदक जिंकले. महिलांच्या चार किलोमीटर अंतराच्या सांघिक कौशल्य स्पर्धेत महाराष्ट्राला कांस्य पदक मिळाले. या संघात वैष्णवी गाभणे संस्कृती खेसे, सिया ललवाणी व पूजा दानोळी यांचा समावेश होता. महाराष्ट्राने ही शर्यत पाच मिनिटे 32.643 सेकंदांत पार केली. हरयाणा (पाच मिनिटे 26.920 सेकंद) व ओडिशा (पाच मिनिटे 30.423 सेकंद) यांनी अनुक्रमे सुवर्ण व रौप्य पदक जिंकले. महाराष्ट्राच्या श्वेता गुंजाळ हिने पाच फेऱ्यांचा समावेश असलेल्या ‘केरीन’ सायकलिंग या क्रीडा प्रकारात रौप्यपदक पटकाविले.

तिरंदाजीतही सुवर्ण हुकले

डेहराडून – महाराष्ट्राचे आणखी एक सुवर्ण हुकले. मंगळवारीही अनेक स्पर्धांच्या अंतिम स्पर्धेत हार मानणाऱया महाराष्ट्राला आज एकही सुवर्ण पदक जिंकता आले नाही. तिरंदाजी क्रीडा प्रकारातील कंपाऊंड राऊंड महिलामध्ये अखेरच्या क्षणापर्यंत श्वास रोखायला लावणाऱया अंतिम लढतीत महाराष्ट्राच्या अदिती स्वामी, मधुरा धामणगावकर, प्रीतिका प्रदीप यांच्या संघालाही रौप्य पदकावर समाधान मानावे लागले. प्रतिस्पर्धी पंजाब संघाने अवघ्या एका गुणाच्या फरकाने बाजी मारत सुवर्ण पदकावर नाव कोरले.

डेहराडून येथील मुख्य क्रिकेट स्टेडियममध्ये महाराष्ट्र विरुद्ध पंजाब हा अंतिम सामना अतिशय रंगतदार झाला. हवेच्या वेगात सुवर्ण पदकासाठी दोन्ही संघातील तुल्यबळ धनुर्धारी भिडले होते. धनुर्धारींनी मारलेला बाणाचा प्रत्येक वेध आणि त्यास मिळणारा प्रेक्षकांचा प्रचंड प्रतिसाद यामुळे सुवर्ण पदकाची लढत डोळय़ाची पारणे फेडणारी ठरली. अदिती स्वामी (सातारा), मधुरा धामणगावकर व प्रीतिका प्रदीप (पिंपरी-चिंचवड) या महिला संघाने सुवर्ण पदकासाठी सर्वस्व पणाला लावले, मात्र दोन वेळा मिळालेले 8 गुण महाराष्ट्राला महागात पडले अन् त्यांचे सोनं जिंकण्याचे प्रयत्न अपयशी ठरले.