सिमोना हालेपचा टेनिसला अलविदा

दोनवेळा ग्रॅण्डस्लॅमला गवसणी घालणाऱया सिमोना हालेपने टेनिसमधून निवृत्ती पत्करली. इटलीच्या लुसिया ब्रोंझेटीकडून पहिल्या फेरीत 6-1, 6-1 असा धक्कादायक पराभव सहन करावा लागल्याने रोमानियन टेनिसस्टार हालेपने ट्रानसिल्व्हेनिया ओपनमध्ये कोर्टवरच निवृत्तीची घोषणा केली. निवृत्तीचा निर्णय जाहीर केल्यानंतर हालेप म्हणाली, मी माझ्या विवेकबुद्धीनुसार हा निर्णय घेतला आहे. मी जगात नंबर वन झाले, मी ग्रॅण्डस्लॅम जिंकले, ही चांगली गोष्ट होती, मला फक्त हेच हवे होते. आयुष्य चालूच रहाते. टेनिसनंतरही जीवन आहे. दोन वर्षांच्या डोपिंग प्रकरणानंतर डब्ल्यूटीए टूरमध्ये परतल्यानंतर या आठवडय़ात झालेली ही तिची पाचवी स्पर्धा होती. गेल्या महिन्यात गुडघ्याच्या दुखापतीमुळे तिला ऑस्ट्रेलियन ओपनच्या पात्रता फेरीतून माघार घ्यावी लागली. 2018 मध्ये स्लोन स्टीफन्सला हरवून हालेपने फ्रेंच ओपनचे विजेतेपद पटकावले होते. त्यानंतर 2019 मध्ये विम्बल्डनचे जिंकण्याचाही तिने पराक्रम केला होता.