मतदान प्रक्रियेत पारदर्शकता व सुलभता आणण्यासाठी मविप्र शिक्षणाधिकारी डॉ. नितीन जाधव व प्राचार्य डॉ. ज्ञानोबा ढगे या नाशिककर तज्ञांनी ‘ब्लॉकचेन ट्रकर’ डिझाइन केले आहे. मतपत्रिकांची अखंडता व सत्यता सुनिश्चित करण्यासाठी ब्लॉकचेन, तर यंत्रांची छेडछाड व फेरफार रोखण्यासाठी ब्लॉकचेनवर आधारित ट्रकिंग प्रभावी ठरू शकते. या डिझाइनला केंद्र सरकारकडून पेटंट मिळाले आहे.
सुरक्षित आणि पारदर्शक ट्रकिंगसाठी ब्लॉकचेन तंत्रज्ञान महत्त्वाचे आहे. तसेच लेजर सिस्टीम व एण्ड टू एण्ड दृश्यमानता आणि पडताळणी ही ब्लॉकचेन ट्रकरची वैशिष्टय़े आहेत. मतदान प्रक्रियेत प्रामुख्याने मतपत्रिका, मतदान यंत्रे आणि संबंधित साहित्याच्या सुरक्षित ट्रकिंग व पडताळणीसाठी या ट्रकरचा प्रभावी वापर होऊ शकतो. मतदानाशी संबंधित सर्व क्रियांच्या ट्रकिंगसाठी अपरिवर्तनीय ऑडिट ट्रेल तयार करता येईल. त्याचबरोबर ही प्रणाली कृषी, औषधनिर्माण क्षेत्र, आरोग्य सेवा, उद्योग, लॉजिस्टिक्स, वाहतूक, सरकारी पुरवठा योजना यांच्यासाठीही उपयुक्त ठरणार आहे, अशी माहिती डॉ. जाधव व प्राचार्य ढगे यांनी दिली.
‘मविप्र’तर्फे सत्कार
हे पेटंट मिळाल्याबद्दल मविप्र संस्थेच्या वतीने शिक्षणाधिकारी नितीन जाधव व पिंपळगाव बसवंतच्या कर्मवीर काकासाहेब वाघ महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. ज्ञानोबा ढगे यांचा सत्कार करण्यात आला. या वेळी सरचिटणीस अॅड. नितीन ठाकरे, सभापती बाळासाहेब क्षीरसागर, अध्यक्ष डॉ. सुनील ढिकले, उपाध्यक्ष विश्वास मोरे यांच्यासह पदाधिकारी, प्राचार्य, विभागप्रमुख, प्राध्यापक उपस्थित होते.