![high court](https://www.saamana.com/wp-content/uploads/2024/10/highcourt-696x447.jpg)
आयकर विभागाने एकाच्या घरी धाड टाकली. तेथून तब्बल 70 तोळे सोने जप्त केले. हे सोने एका बँकेच्या लॉकरमध्ये ठेवले. तेथून ते सोने गहाळ झाले आहे. याची गंभीर दखल घेत उच्च न्यायालयाने या प्रकरणी कारवाईचे आदेश दिले आहेत. न्या. एम.एस. सोनक व न्या. जितेंद्र जैन यांच्या खंडपीठासमोर ही सुनावणी झाली. सोने परत मिळावे यासाठी याचिका करणारे हिरालाल मालू 88 वर्षांचे आहेत. सोन्याबाबत चौकशी सुरू आहे. मालू यांना सोने परत करण्यासाठी आयकर विभाग जबाबदार आहे, असे बँकेचे म्हणणे आहे. तर बँकेने कार्यवाही पूर्ण केली नसल्याचा दावा आयकर विभागाने केला आहे. यामध्ये ज्येष्ठ नागरिक भरडला गेला आहे. एका ज्येष्ठ नागरिकाची ही अवस्था होत असेल तर अन्य नागरिकांची कशा प्रकारे पिळवणूक होत असेल हे यावरून स्पष्ट होते. त्यामुळे सेंटर बोर्ड ऑफ डायरेक्ट टॅक्स व महाराष्ट्र बँकेचे प्रमुख यांनी याबाबत योग्य ती कारवाई करावी, असे आदेशात नमूद केले.