अमेरिकेनंतर आता अर्जेंटिनानेही WHO मधून बाहेर पडण्याची केली घोषणा, काय आहे कारण? वाचा…

अर्जेंटिनाने बुधवारी जागतिक आरोग्य संघटनेतून (WHO) बाहेर पडण्याची घोषणा केली आहे. अर्जेंटिनाचे राष्ट्राध्यक्ष जेवियर मायली यांचे प्रवक्ते मॅन्युएल अ‍ॅडोर्नी यांनी ही माहिती दिली. माध्यमांशी संवाद साधताना त्यांनी सांगितलं की, आरोग्य व्यवस्थापनावरून असलेल्या मतभेदांमुळे हा निर्णय घेण्यात आला. कोविड-19 च्या काळात डब्लूएचओच्या धोरणांवर ते समाधानी नव्हते, असंही ते म्हणाले.

माध्यमांशी संवाद साधताना मैनुअल एडोर्नी म्हणाले की, ”राष्ट्राध्यक्ष जेवियर मायली यांनी देशाला डब्लूएचओपासून वेगळे करण्याचा निर्णय घेतला आहे. कोविड दरम्यान डब्लूएचओने मानवी इतिहासातील सर्वात मोठा शटडाऊन लादला. शिवाय अर्जेंटिना आपल्या सार्वभौमत्वात कोणत्याही आंतरराष्ट्रीय संघटनेचा हस्तक्षेप सहन करणार नाही.”

याआधी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी डब्लूएचओपासून वेगळे होण्याचा निर्णय घेतला होता. त्यानंतर आता अर्जेंटिनाने डब्लूएचओमधून बाहेर पडण्याची घोषणा केली. दरम्यान, डब्लूएचओ ही संयुक्त राष्ट्रांची एक विशेष आरोग्य संस्था आहे. ज्याची स्थापना 1948 करण्यात आली. जगभरातील 150 हून अधिक देश याचे सदस्य आहेत.