चेंगराचेंगरीचा महाकुंभावर परिणाम; भाविकांची संख्या घटली, विमान तिकीट स्वस्त; दुकानांचा धंदा अर्ध्यावर

महाकुंभमेळय़ामध्ये मौनी अमावास्येच्या रात्री झालेल्या चेंगराचेंगरीच्या घटनेचा महाकुंभवर परिणाम झाल्याचे दिसत आहे. महाकुंभमध्ये येणाऱ्या भाविकांची संख्या झपाटय़ाने कमी झाली आहे. याचा थेट परिणाम अर्थव्यवस्थेवर पडल्याचे चित्र आहे. विमान तिकीट दर 40 टक्क्यांपर्यंत स्वस्त झाले आहे. हॉटेल्स बुकिंग रद्द केली जात आहेत. ट्रव्हल्स बुकिंगमध्येही कमालीची घट झाली आहे. तसेच प्रयागराजमधील दुकानदारांच्या विक्रीत 40 टक्क्यांपर्यंत घसरण झाली आहे.

मौनी अमावास्येला हॉटेलचालकांनी वाढवलेले दर कमी करण्यात आले आहेत. यापूर्वी केलेले सर्व आगाऊ बुकिंग रद्द करण्यात आले आहेत. चेंगराचेंगरीनंतरच्या परिस्थितीमुळे इतर राज्यांमधून कमी लोक प्रयागराजला येत आहेत. त्यामुळे हॉटेल बुकिंगमध्ये घट झाली आहे. प्रयागराजमध्ये सुमारे 250 लहान-मोठी हॉटेल्स आहेत. संगम वगळता इतर भागातील हॉटेल्सचे दर पूर्वीसारखेच आहेत. पण, येथील बुकिंगची परिस्थितीही फारशी चांगली नाही. महाकुंभमेळा परिसरात 5 हजारांहून अधिक दुकानदार आहेत. चेंगराचेंगरीनंतर गर्दी कमी झाल्यामुळे त्यांच्या विक्रीवर परिणाम झाला आहे. मुंबई ते प्रयागराज विमान प्रवासाचे भाडे 16,000 ते 22,000 रुपयांपर्यंत आहे. अहमदाबाद ते प्रयागराज विमान प्रवास 13 ते 20 हजार रुपयांपर्यंत उपलब्ध आहे. आधी हे तिकीट 50 हजारांपर्यंत पोहोचले होते.

हॉटेल बुकिंग रद्द

चेंगराचेंगरीच्या घटनेनंतर सुरक्षेचा उपाय म्हणून प्रयागराज पोलिसांनी जिह्याच्या प्रवेशद्वारांवर सुरक्षा व्यवस्था कडक केली आहे. कोणत्याही वाहनांना आत येऊ दिले जात नाही. जे लोक त्यांच्या कुटुंबासह कारने किंवा अन्य वाहनाने येथे येत आहेत त्यांना प्रवेश बिंदूवरच थांबवले जात आहे. लोक सीमेवर त्यांची वाहने पार्क करू शकत नाहीत. त्यामुळे त्यांना सर्व सामान घेऊन पायी जावे लागत आहे. यामुळे प्रयागराजला आलेल्या ग्राहकांकडून हॉटेल बुकिंग रद्द केली जात आहेत, असे हॉटेल मालकांनी सांगितले.

प्रवास बुकिंगवर परिणाम

चेंगराचेंगरीनंतर बाहेरून लोक प्रयागराजला येत नाहीत. 4 दिवसांच्या टूरसाठी आलेले लोकही अवघ्या दोन दिवसांत परत जात आहेत. अनेकांची गैरसोय होत असल्याने ते प्रयागराजला थांबत नाहीत. प्रयागराज पोलिसांनी झुसी पुलावरून वाहने वळवली आहेत. यामुळे झुसी पूल जाम राहतो. अशा परिस्थितीत, कोखराज मार्गे वाहने अयोध्येला जात आहेत. त्यामुळे अनेक ट्रव्हल्सच्या बुकिंगवर याचा थेट परिणाम झाला आहे. टूर ट्रव्हल्सवर परिणाम झाल्याचे अनेक ट्रव्हल्स एजन्सीजने मान्य केले आहे.