![spadex](https://www.saamana.com/wp-content/uploads/2025/02/spadex-696x447.jpg)
>> वैश्विक, [email protected]
‘इस्रो’ या देशाच्या आवकाश विज्ञान संस्थेने पुन्हा एकदा ऐतिहासिक कामगिरी केली असून इस्रोचे सर्व संशोधक अभिनंदनास पात्र आहेत. ‘स्पेडेक्स’ या ‘स्पेस डॉपिंग’ प्रकल्पाला यश लाभलं असून देशवासीयांना आपल्या संशोधकांचा अभिमान वाटतो. गुरुवार दिनांक 16 जानेवारी रोजी पृथ्वीजवळच्या अंतराळी कक्षेत दोन उपग्रहांची जुळणी करण्यात अपूर्व यश मिळवल्यामुळे भविष्यात आपले स्वतःचे ‘स्पेस स्टेशन’ही हिंदुस्थान अंतराळात उभारू शकेल किंवा सध्याच्या ‘स्पेस स्टेशन’शी यशस्वी ‘डॉपिंग’ करून आपले अंतराळयात्री स्वतःच पाठवू शकेल. अर्थात या साऱ्या शक्यता आहेत. यापैकी कोणते प्रकल्प कधी हाती घेऊन पूर्णत्वाला जातील ते आपल्या वेगवान अंतराळ कार्यक्रमांवर अवलंबून राहील. ‘गगनयान’सारखा महत्त्वाकांक्षी प्रकल्प यशस्वी झाला की, जागतिक अंतराळ संशोधनात आपला सन्मान आणि सामर्थ्य दोन्ही वाढेल. आजमितीला तरी ‘इस्रो’च्या शिरपेचात आणखी एक यशाचा तुरा खोवला गेला आहे याचा आनंद प्रत्येकाला वाटेल.
जानेवारीच्या 7 तारखेपासूनच या ‘डॉपिंग’ची चर्चा सुरू झाली होती. अंतराळातील पृथ्वीनिकटच्या कक्षेत दोन यानं व्यवस्थित भ्रमण करत होती. मात्र त्यांची जुळणी होण्यासाठी अतिशय अचुकतेने काम करणे गरजेचे होते. म्हणूनच दोन वेळा पंधरा मीटरपर्यंत जवळ येऊनही या यानांची ‘गळाभेट’ (डॉपिंग) होऊ शकली नव्हती. सूक्ष्म व गणिती पद्धतीने प्राप्त करण्याच्या या यशात थोडीशी जरी गफलत झाली असती तरी ‘डॉपिंग’ प्रकल्प धोक्यात आला असता. अशी काही आकस्मिक (अनफोरसीन) कारणं उद्भवतात हे अनुभवांती ‘इस्रो’ला ठाऊकच होतं. ‘चांद्रयान-2’च्या चंद्रावतरणाच्या एक क्षणी झालेली गडबड संशोधकांना धक्कादायक होती. अटोकाट काळजी घेऊनसुद्धा अनेक वेळा यश हाती लागत नाही असं तेव्हा झालं. या वेळी मात्र ‘डॉपिंग’ यशस्वी झाल्याने अमेरिका, रशिया, चीन यांच्या पंक्तीत बसणारे चौथे राष्ट्र म्हणून आपला गौरव झाला.
‘क्रायोजेनिक इंजिन’ या निर्मितीपासून अंतराळ कार्यक्रमात स्वयंपूर्ण होण्याची आपली प्रक्रिया सुरू झाली. त्यातलाच हा पुढचा टप्पा. आपल्या उत्कर्षाच्या कार्यक्रमांना मित्र म्हणवणारे देशही ऐनवेळी हात कसा आखडता घेतात याचा अनुभव ‘क्रायोजेनिक इंजिन’च्याबाबत आपण घेतला होता. ते साध्य झाल्यावर आपण आपला उपग्रह पृथ्वीपासून 36800 किलोमीटरवर असलेल्या भूस्थिर कक्षेतही पाठवू शकतो.
आता हा वेग थांबणार नाही. त्याचे अनेक व्यावहारिक फायदेही आहेत. जगातले सगळेच देश व्यापक अंतराळ कार्यक्रम हाती घेऊ शकत नाहीत. त्यापेक्षा अन्य देशांच्या मदतीने, पैसे मोजून स्वतःचे उपग्रह अंतराळात सोडणं त्यांना परवडतं. आपला पहिला ‘आर्यभट्ट’ उपग्रह रशियाच्या मदतीनेच अंतराळात गेला होता आणि एकमेव अंतराळयात्री राकेश शर्मासुद्धा रशियाच्याच मदतीने अंतराळ प्रवास करू शकला. पुढच्या काळात आपले अंतराळयात्री आपल्याच यानातून अवकाशात पाठवले जातील.
अंतराळात ‘डॉपिंग’ करण्यासाठी दोन जुळे उपग्रह इस्रोने बनवले होते. त्यातला एक ‘चेसर’ (मागोवा घेणारा) आणि दुसरा ‘टार्गेट’ (लक्ष्य) असे होते. इस्रोच्या यू.आर. राव सॅटेलाइट सेंटरमध्ये ते तयार झाले. सतीश धवन स्पेस सेंटर येथून 30 डिसेंबर 2024 रोजी या उपग्रहांनी यशस्वी उड्डाण केलं आणि प्रत्येकी 220 किलो वजनाचे हे उपग्रह सहप्रवासी (को-पॅसेंजर) म्हणून अवकाशात झेपावले आणि पृथ्वीपासून 475 किलोमीटरच्या कक्षेत फिरू लागले.
यामागची अनेक उद्दिष्टे सफल झाली. स्वतंत्रपणे दोन उपग्रहांची अवकाशात जुळणी करणे, दोन्ही उपग्रहातल्या विद्युतक्षमतेची चाचणी घेणे, ‘ऑटिटय़ूट कंट्रोल’ सिस्टिम वापरून दोन्ही उपग्रहांचे एकाच वेळी सूत्रसंचालन करणे, ‘डॉपिंग’नंतर पुन्हा ते उपग्रह विलग करून त्यावरील उपकरणांनुसार (पेलोड) ते कार्यरत ठेवणे असा हा सुमारे 132 कोटींचा प्रकल्प खूपच महत्त्वाकांक्षी आहे.
सुरुवातीला 470 किलोमीटरच्या कक्षेत 55 अंशांच्या कलाने हे उपग्रह फिरू लागले. हळूहळू ते जवळ आणत त्यांची भेट (डॉपिंग) घडवण्यात आली. हे उपग्रह सोडताना त्यांच्यात 10 ते 20 किलोमीटरचे अंतर होते. भारतीय डॉपिंग सिस्टम (बीडीएस) ही इस्रोनेच जागतिक दर्जाची डॉपिंग यंत्रणा तयार करण्यात यश मिळवल्याने ‘स्पेडेक्स’ प्रकल्प पूर्णत्वाला गेला. हे उपग्रह सुमारे ताशी 28,800 किलोमीटर वेगाने भिरभिरत असल्याने त्यांचा वेग कमी करत करत ताशी 0.036 किलोमीटर एवढा कमी करण्याचे आव्हान संशोधकांसमोर होते.
उपग्रहांचे डॉपिंग पोर्ट केवळ 450 मिलिमीटर इतक्या सूक्ष्म व्यासाचे होते. (गगनयान आणि अंतरिक्षचं 800 एमएम असेल) यावरून गणिती अचुकता किती महत्त्वाची ठरली हे लक्षात येईल. गतीनियमन करण्यासाठी 24 शक्तिशाली मोटर्स वापरण्यात आल्या. या मोहिमेसाठी ‘पीएसएलव्ही’ इन्टिग्रेशन फॅसिलिटीमध्ये उपग्रहांची निर्मिती झाली. शेवटी हे ‘जुळे’ उपग्रह 8 जानेवारीला परस्परांपासून 600 मीटर दूर करण्यात आले आणि वेग कमी करत त्यांची 16 जानेवारीला जुळणी झाली. मकर संक्रांतीच्या आसपासचे हे वैज्ञानिक ‘संक्रमण’ सतत सुरू राहणार आहे.