भाजपच्या बड्या नेत्यावर आली भीक मागण्याची वेळ, फोटो व्हायरल

सोशल मीडियावर सध्या एका बड्या भाजप नेत्याचे काही फोटो प्रचंड व्हायरल होत आहे. या फोटोंमध्ये भाजपचा नेता भीक मागताना दिसत आहेत. या नेत्याचं नाव इंद्रजित सिन्हा असून ते पश्चिम बंगालमधील बीरभूम जिल्ह्यातील तारापीठ स्मशानभूमी येथे भीक मागताना दिसले. ‘बुलेट दा’ म्हणून प्रसिद्ध असलेल्या इंद्रजित सिन्हा यांचे भीक मागताना फोटो व्हायरल होताच एकच खळबळ उडाली आहे.

पक्षाच्या जुन्या नेत्याची अवस्था पाहून पश्चिम बंगाल राज्याचे भाजप अध्यक्ष आणि केंद्रीय शिक्षण मंत्री डॉ. सुकांता मजुमदार यांनी त्यांना तातडीने मदत देऊ केली. मजुमदार यांनी बीरभूमच्या भाजप जिल्हाध्यक्षांना इंद्रजित सिन्हा यांना रुग्णालयात दाखल करण्यास सांगितले. यानंतर त्यांना एका खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.

कोण आहेत इंद्रजित सिन्हा?

इंद्रजित सिन्हा हे भाजपच्या आरोग्य सेवा कक्षाचे संयोजक राहिले आहेत. आधी ते काँग्रेस पक्षात होते. मात्र 10 वर्षांपूर्वी त्यांनी काँग्रेस पक्ष सोडत भाजपमध्ये प्रवेश केला. गेल्या दोन वर्षांपासून ते कर्करोगाशी झुंज देत आहेत. उपचारांसाठी त्यांच्याकडे आर्थिक बळ नसल्यामुळे त्यांना घरोघरी भटकंती करावी लागली. त्यांच्याकडे राहण्यासाठी जागाही नव्हती. परिस्थिती इतकी बिकट झाली की शेवटी त्यांच्यावर भीक मागण्याची वेळ आली.