तर मुंबईकरांना धारावीत मोफत घर मिळणार का? आदित्य ठाकरे यांचा राज्य सरकारला सवाल

मुंबईत अदानीसाठी जमीन बळकावण्याचा खर्च मुंबईकरांनी का उचलावा असा सवाल शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे आमदार, युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांनी विचारला. तसेच मुंबईकरांच्या या योगदानाबद्दर त्यांना धारावीत मोफत घरं मिळणार आहेत का असेही आदित्य ठाकरे म्हणाले.

एक्सवर पोस्ट करून आदित्य ठाकरे म्हणाले की, अदानी समूहाचा धारावी भूखंड बळकावण्याचा खर्च मुंबईकरांनी का उचलावा? गेल्या आठवड्यात भाजप सरकारने मुंबई महानगर पालिकेला देवनार डंपिंग ग्राउंड स्वच्छ करण्यासाठी (मुंबईच्या करदात्यांचा पैसा) खर्च करण्याचा आदेश दिला. हा खर्च अंदाजे तीन हजार कोटीं रुपयांचा आहे. देवनारची ही जमीन आधीच अदानी समूहाला देण्यात आली आहे, तीही BMC च्या इच्छेविरुद्ध. काल, BMC च्या अर्थसंकल्पात हा खर्च लपवण्यासाठी प्रत्येक घरामागे ‘कचरा संकलन शुल्क’ लावण्याचा प्रस्ताव ठेवण्यात आला आहे. ह्या जमिनीच्या बळकावण्याचा खर्च मुंबईकरांनी का उचलावा? मुंबईकर देत असलेल्या ह्या योगदानाच्या बदल्यात त्यांना धारावीत मोफत घरे मिळणार आहेत का? असा सवाल आदित्य ठाकरे यांनी उपस्थित केला आहे.