राज्याच्या मंत्रिमंडळात 65 टक्के मंत्री भ्रष्टाचारी, मंत्रिमंडळाला बरखास्त केलं पाहिजे – नाना पटोले

महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळात 65 टक्के मंत्री हे भ्रष्टाचारी असून त्यांच्यावर खून, बलात्कारचे आरोप आहेत. 65 टक्के मंत्रिमंडळच जर भ्रष्टाचारी असेल तर, हे मंत्रिमंडळ बरखास्त केलं पाहिजे, ही भूमिका काँग्रेस पक्षाची आहे, असं महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले म्हणाले आहेत. मुंबईत आयोजित पत्रकार परिषदेत ते असं म्हणाले आहेत.

नाना पटोले म्हणाले की, ”फक्त धनंजय मुंडेच नाही, तर je दागी मंत्री आहेत, त्या सगळ्यांची माहिती आम्ही विधानभवनात मांडणार आणि सरकारला याचं उत्तर द्यावं लागेल.” यावेळी पत्रकारांनी त्यांना प्रश्न विचारला की, ओबीसी म्हणून मला टार्गेट केलं जात आहे, असं धनंजय मुंडे म्हणाले. तुम्हाला वाटतंय का धनंजय मुंडे यांना ओबीसी असल्यामुळे टार्गेट केलं जात आहे? याचं उत्तर देताना नाना पटोले म्हणाले की, महाराष्ट्रात ओबीसींची परिस्थिती फार वाईट आहे. ओबीसींची मते भाजप घेते, मात्र सातत्याने ओबीसींवर अत्याचार करत आहे. हे आम्ही जेव्हा म्हणालो होतो, तेव्हा तो आरोप होता. आता त्या मंत्रिमंडळातलाच ‘मंत्री मी ओबीसी आहे म्हणून मला टार्गेट केलं जात आहे’, असं म्हणत असेल तर, मग आम्ही केलेले आरोप सत्य आहेत.

ते म्हणाले, ”ओबीसींच्या मुलांची आज स्कॉलरशिप, राजकीय आरक्षण, ओबीसींचा आर्थिक आणि सामाजिक विषय असेल, याकडे भाजप दुर्लक्ष करत आहे. भाजपने सातत्याने ओबीसी समाजाला टार्गेट केलं आहे, त्यांना विरोध केला आहे. यातच धनंजय मुंडे ज्याप्रकारे आपली भूमिका मांडत आहे, यावरून हे स्पष्ट होत आहे. याआधी छगन भुजबळ यांनीही आपली भूमिका मांडली. ओबीसींचं नेतृत्व करणाऱ्या छगन भुजबळ यांनाही त्यांनी अपमानित केलं. यामुळे भाजप सातत्याने ओबीसींच्या विरोधात आहे, यातून हे स्पष्ट झालं आहे.”