Kolhapur News शिरोळ तालुक्यातील शिवनाकवाडीत महाप्रसादातून दोनशे जणांना विषबाधा

शिरोळ तालुक्यातील शिवनाकवाडी येथे यात्रेतील महाप्रसाद खाल्ल्याने जवळपास 200 जणांना अन्नातून विषबाधा झाल्याची घटना घडली आहे. गावातील प्रत्येक घरात दोन-तीन जणांना मध्यरात्रीपासून वांती, जुलाब सुरू झाले. इचलकरंजीतील इंदिरा गांधी सामान्य रुग्णालयात लहान मुलांसह महिला, पुरुष व वृद्ध अशा सुमारे 100 जणांवर सध्या उपचार सुरू असून त्यांच्यासाठी स्वतंत्र कक्ष निर्माण करण्यात आला आहे.

संपूर्ण गावावरच प्रसंग ओढवल्याने शिवनाकवाडी परिसरासह इचलकरंजीतील काही खाजगी रुग्णालयातही रुग्ण दाखल करण्यात आले आहेत. याबाबत रुग्णालय व घटनास्थळावरुन मिळालेली माहिती अशी, शिवनाकवाडी (ता. शिरोळ) येथे मंगळवारी ग्रामदैवत श्री कल्याणताई माता देवीची यात्रा होती. यात्रेनिमित्त दुपारी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते. संपूर्ण गावाने या महाप्रसादाचा आस्वाद घेतला मध्यरात्रीनंतर काहीजणांना जुलाब आणि वांती सुरू झाल्या. पहाटेपर्यंत संपूर्ण गावालाच ही बाधा झाल्याचे लक्षात आल्यानंतर नागरिकांनी अशा रुग्णांना प्राथमिक आरोग्य केंद्रासह खाजगी रुग्णालयात दाखल केले. परंतु बाधितांची संख्या वाढतच चालल्याने त्यांना आसपाससह इचलकरंजीतील इंदिरा गांधी सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले. अचानकपणे मोठ्या संख्येने रुग्ण दाखल होऊ लागल्याने रुग्णालय प्रशासनाचीही तारांबळ उडाली. मात्र रुग्णालय प्रशासनाने तातडीने यंत्रणा गतिमान करत सर्व वैद्यकिय अधिकारी, परिचारीका, परिचारक, कर्मचारी यांना एकत्र बोलावून उपचार यंत्रणा कार्यान्वित केली. रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेऊन 100 रुग्णांसाठीचा स्वतंत्र कक्ष उघडण्यात आला. त्याठिकाणी या रुग्णांवर उपचार सुरु केले. तर आवश्यक औषधसाठाही उपलब्ध करुन देण्यात आला आहे. रुग्णालयाच्या वैद्यकिय अधिक्षक डॉ. भाग्यरेखा पाटील व त्यांच्या पथकाने तातडीने उपचार यंत्रणा राबवत औषधोपचार सुरू केल्याने तातडीने उपचार मिळून अनेक रुग्णांना दिलासा मिळाला.

इंदिरा गांधी सामान्य रुग्णालयासह काही खाजगी रुग्णालयातही बाधित रुग्णांना दाखल करण्यात आले आहे. तर शिवनाकवाडी परिसरातील दवाखान्यातही अनेकांवर उपचार सुरू आहेत. शिरोळचे आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर, इच्लकरंजीचे आमदार राहुल आवाडे यांनी रुग्णांची भेट घेऊन विचारपूस केली. त्यांना योग्य ते उपचार करावेत,अशी सूचना त्यांनी रुग्णालय व्यवस्थापनाला केली.