ओव्हरटेक केल्याचा रागातून हेल्मेट डोक्यात मारून दुचाकीस्वाराची हत्या

ओव्हरटेक केल्याच्या रागातून दुचाकीस्वाराच्या डोक्यात हेल्मेटने घाव घालत हत्या केल्याची धक्कादायक घटना खारघरच्या उत्सव चौक परिसरात घडली. शिवकुमार शर्मा असे मृत दुचाकीस्वाराचे नाव आहे. शिवकुमार बेलपाडा येथून उत्सव चौकाकडे येत असताना त्यांनी एका दुचाकीला ओव्हरटेक केला. यावर संतापलेल्या दुचाकीवरील दोघांनी शिवकुमार यांची गाडी अडवून शिवीगाळ करत हेल्मेटने बेदम मारहाण केली.

दुचाकीवरील दोन तरुणांनी उत्सव चौक परिसरात शिवकुमार यांची दुचाकी अडवली. त्यांनी शिवकुमारला शिवीगाळ करत, “तू ओव्हरटेक का केला?” असा जाब विचारला. यावरून त्या तिघांमध्ये वादावादी सुरू झाली. दरम्यान दुचाकीवरील दोघा तरुणांनी शिवकुमार यांना हेल्मेटने मारहाण करण्यास सुरुवात केली. मारहाणीत शिवकुमार यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. मोठ्या प्रमाणात रक्तस्त्राव झाल्याने त्यांचा जागीच दुर्दैवी मृत्यू झाला. या मारहाणीनंतर दोघा हल्लेखोरांनी घटनास्थळावरून पोबारा केला आहे. खारघर पोलिसांनी दोन्ही तरुणांविरोधात हत्येचा गुन्हा दाखल करत त्यांचा शोध सुरू केला आहे.