वजन घटवण्याची औषधे जीवावर बेतली, किडन्या फेल झाल्याने राजकीय नेत्याचा मृत्यू

वजन घटवण्यासाठी घेतलेली औषधांमुळे एका राजकीय नेत्याचा मृत्यू झाल्याची खळबळजनक घटना उत्तर प्रदेशात घडली आहे. फुरकान(40) असे मयत नेत्याचे नाव आहे. औषधांमुळे फुरकान यांच्या किडन्या फेल झाल्याने त्यांचा मृत्यू झाला.

फुरकान यांनी फेसबुक आणि यूट्युबवरील जाहिरात पाहून वजन घटवण्यासाठी ऑनलाईन औषधे मागवली होती. या औषधामध्ये ओवा, बडीशेप आणि जिरे पावडर होती. फुरकान यांनी जवळपास सात महिने ही पावडर पाण्यात मिसळून खाल्ली. यादरम्यान ते आजारी पडले. त्यांची तपासणी केली असता चुकीच्या औषधांच्या सेवनामुळे त्यांची किडनी खराब झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले आणि त्यांना डायलिसिस करण्याचा सल्ला दिला.

फुरकान यांच्या नातेवाईकांनी दिलेल्या माहितीनुसार, त्यांचे वजन थोडे कमी होऊ लागले होते, परंतु काही महिन्यांनंतर त्यांची प्रकृती बिघडू लागली. तसेच डॉक्टरांनी दिलेला डायलसिसचा सल्ला न ऐकता त्यांनी आयुर्वेदिक औषधे घेण्यास सुरवात केली. मात्र त्यांची तब्येत अधिकच खालावल्याने त्यांना दिल्लीतील रुग्णालयात नेण्यात आले. मात्र त्यांचा मृत्यू झाला.