दिल्लीत आज मतदान; 699 उमेदवार रिंगणात,1.56 कोटी मतदार ठरवणार भवितव्य

दिल्ली विधानसभेच्या 70 जागांसाठी आज, बुधवारी मतदान होणार असून शनिवारी निकाल लागणार आहे. एकूण 699 उमेदवार रिंगणात आहेत. आम आदमी पक्ष, भाजप आणि काँग्रेस अशी तिरंगी लढत रंगणार आहे. तिन्ही पक्षांनी जोरदार प्रचार केला असून जनतेवर आश्वासनांचा अक्षरशः वर्षावर केला आहे. प्रचारादरम्यान आम आदमी पक्षाचे नेते अरविंद केजरीवाल यांनी भाजपवर मतदार याद्यांमध्ये फेरफार केल्याचा आरोप केला. तिन्ही पक्षांनी एकमेकांवर जोरदार टीका केली. त्यामुळे ही निवडणूक चुरशीची ठरणार असून 1.56 कोटी मतदार उमेदवारांचे भवितव्य ठरवणार आहेत.

लोकसभा निवडणुकीत इंडिया ब्लॉकचा भाग असलेले पाच पक्ष एकमेकांविरोधात उभे ठाकरे असून यापैकी सर्वच्या सर्व 70 जागांवर आम आदमी पक्ष आणि काँग्रेस आमने-सामने आहे. तर भारतीय कम्युनिस्ट पक्षाने 6 जागांवर आपले उमेदवार उभे केले आहेत. भारतीय कम्युनिस्ट पक्ष-मार्क्सवादी आणि भारतीय कम्युनिस्ट पक्ष- मार्क्सवादी लेनिनवादी यांनी प्रत्येकी 2 जागांवर आपले उमेदवार उभे केले आहेत. तर भाजपने 68 जागांवर उमेदवार दिले आहेत. दरम्यान, दिल्लीत 18 टक्के मतदारस्विंग मतदार आहेत. म्हणजेच हे मतदार कोणत्याही पक्षाशी संबंधित नाहीत. तर असे मतदार निवडणुकीत त्याच्या फायद्या आणि तोटय़ाचे गणित ठरवून मतदान करतो.

29 उमेदवार निरक्षर

46 टक्के उमेदवार पाचवी ते बारावी उत्तीर्ण आहेत. 18 टक्के उमेदवार डिप्लोमाधारक असून 6 उमेदवारांना लिहिता- वाचता येत आहे, तर 29 उमेदवारांनी निरक्षर असल्याचे प्रतिज्ञापत्रात नमूद केले आहे.

एकूण 13,766 मतदान केंद्रांवर मतदान होणार असून 699 उमेदवारांचे भवितव्य मतपेटीत बंद होणार आहे. सर्व मतदान केंद्रांवर चोख बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.

निमलष्करी दलाच्या 220 तुकडय़ा, दिल्ली पोलिसांतील 35 हजार 626 कर्मचारी तसेच 19 हजार होमगार्ड तैनात करण्यात आले आहेत. तीन हजार मतदान केंद्रे अतिशय संवेदनशील आहेत.

आमच्यावर दबाव आणला जातोय;  निवडणूक आयोगाचा आरोप

एक्सवर पोस्ट करून आरोप करणे म्हणजे हे दबाव आणण्याचे डावपेच आहेत, असा आरोप निवडणूक आयोगाने केला आहे. निवडणूक आयोग गुंडगिरीला प्रोत्साहन देत असून भाजपाला पाठिंबा देत आहे, असा आरोप आपने केला होता. या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाने आपली भूमिका मांडली आहे. दरम्यान, दिल्ली पोलिसांनी  मुख्यमंत्री अतिशी यांच्याविरोधात आचारसंहिता उल्लंघनाचा गुन्हा दाखल केल्यानंतर आपने एक्सवरून निवडणूक आयोगावर आरोप केला होता. निवडणूक आयोगाने म्हटले आहे की आम्ही एक संवैधानिक संस्था आहोत आणि अशा आरोपांना तोंड देण्यास सक्षम आहोत. अशा आरोपांमुळे आम्हाला काहीही फरक पडणार नाही, असे निवडणूक आयोगाने म्हटले आहे.