संसदेत दिल्लीच्या प्रचाराचे भाषण, मोदी घसरले राहुल आणि केजरीवालांवर

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज संसदेत दिल्ली विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराचे भाषण ठोकले. आपल्या 1 तास 35 मिनिटांच्या भाषणात मोदींनी केजरीवाल आणि  लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्यावर टीकास्त्र सोडले. दिल्ली विधानसभा निवडणुकीसाठी उद्या मतदान होत असून त्याच्या एक दिवसआधीपासून आचारसंहिता लागू झाली. असे असताना मोदींनी मात्र संसदेतील भाषणाची संधी साधत जणू पक्षाच्या उमेदवारांसाठी उघडपणे प्रचार केला, अशीच चर्चा संसदेत रंगली होती.

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या अभिभाषणावरील आभारदर्शक प्रस्तावावर बोलताना मोदी यांनी केजरीवाल यांच्या पक्षाचा आपदा म्हणजेच आपत्ती असा उल्लेख केला. काही पक्ष तरुणांच्या भविष्यासाठी आपदा आहेत, असे ते म्हणाले. आधी वर्तमानपत्रात मथळे यायचे की, इतक्या कोटींचे घोटाळे. आता दहा वर्षांत अजिबात घोटाळे झालेले नसून लाखो, करोडो रुपये वाचले आहेत. तसेच आम्ही सरकारी योजनांमधून प्रचंड पैसा वाचवला, परंतु त्याचा वापर शीश महल बांधण्यासाठी नाही तर देशासाठी केला, अशा शब्दांत मोदींनी  टीका केली.

त्यांना गरीबांविषयी बोलणे  कंटाळवाणे वाटते

काही लोकांच्या घरात स्टायलिश शॉवरवर पह्कस असतो, परंतु आमचा पह्कस घराघरात नळ पोहोचवण्यावर आहे.  राष्ट्रपतींनी  भाषणात याबाबत विस्तारपूर्वक सांगितले, परंतु गरीबांच्या झोपडय़ांमध्ये जाऊन पह्टोसेशन करणाऱ्यांना संसदेत गरीबांविषयी बोलणे  कंटाळवाणे वाटते, असा टोला मोदींनी राहुल गांधी यांना लगावला.

शहरी नक्षलवादावर बोलणाऱ्यांना संविधान काय कळणार?

काहीजण दुर्दैवाने शहरी नक्षलवादाची  भाषा करत आहेत, त्यांना संविधान काय कळणार? देशाचे ऐक्य काय समजणार? असे मोदी म्हणाले. आम्ही अनुच्छेद 370 ची भिंत पाडली. संविधानाचे महत्त्व आम्हाला माहीत आहे. जे लोक खिशात संविधान घेऊन फिरतात त्यांना हे कळणार नाही की मुस्लिम महिलांवर तुम्ही काय वेळ आणली होती. आम्ही तीन तलाकचा खात्मा केला  असे मोदी म्हणाले.

पंतप्रधानांचा जनतेशी कनेक्ट तुटलेला आहे. जनतेच्या गरजा काय आहेत हेही त्यांना कळलेले नाही, असे आजच्या भाषणावरून दिसते. – प्रियंका गांधी (काँग्रेस नेत्या)

चेंगराचेंगरीतील मृतांविषयी संवेदना म्हणून मोदींनी श्रद्धांजलीही वाहिली नाही. सरकारला खेळणी बनवण्याची चिंता आहे; पण लोकांच्या जिवाची नाही. – अखिलेश यादव (अध्यक्ष, सपा)