मुख्यमंत्र्यांचा आदेश शिंदेंच्या मंत्र्यांकडून धाब्यावर, मंत्रालयात तीन दिवस उपस्थितीच्या निर्णयाला हरताळ

राज्याच्या ग्रामीण भागातून मंत्रालयात येणाऱ्या सर्वसामान्यांच्या समस्या सोडवण्यासाठी महायुतीच्या मंत्र्यांनी आठवडय़ातून तीन दिवस मंत्रालयात उपस्थित राहण्याचे आदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहेत. पण उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी हे आदेश मोडीत काढत त्यांच्या गटातील मंत्र्यांना आठवडय़ातून तीन दिवस मंत्रालयाऐवजी मंत्रालयासमोरील बाळासाहेब भवनात लोकांना भेटण्याचे आदेश जारी केले आहेत. त्यामुळे महायुतीमधील बेबनाव पुढे आला आहे.

महायुतीच्या मंत्र्यांनी आठवडय़ातून तीन दिवस मंत्रालयात उपस्थित राहण्याचे आदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहे. आठवडय़ातील तीन दिवस म्हणजे साधारणपणे सोमवार ते बुधवारी मंत्रालयात उपस्थित राहावे अशी अपेक्षा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केली आहे. पण नेमक्या याच तीन दिवसांत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यांच्या मंत्र्यांना मंत्रालयाच्या बाहेर जनतेला भेटण्याचे आदेश दिले आहेत.

मुख्यमंत्र्यांचे आदेश काय आहेत

महायुतीमधील सर्व मंत्र्यांनी कार्यभार स्वीकारल्यानंतर मंत्रिमंडळाची पहिलीच बैठक झाली. त्यामध्ये मंत्र्यांनी यापुढे जबाबदारीने काम करावे. तुम्हा सर्वांनाच तुम्हाला दिलेल्या खात्याबरोबरच मतदारसंघासाठीही वेळ द्यावा लागतो. मतदारसंघाच्या विकासासह राज्यातील विकासकामांकडेही लक्ष द्यावे लागते. पण मंत्री हा संपूर्ण राज्याचा असतो. त्यामुळे मंत्र्यांनी आपल्या वेळेचे योग्य नियोजन करावे. त्यामुळे दर आठवडय़ाला किमान तीन दिवस मंत्र्यांनी मुंबईत थांबावे. लोकांच्या कामासाठी मंत्रालयात भेटावे आणि उरलेल्या दिवसात मतदारसंघातील कामांचे नियोजन करा, अशा सूचना केल्या.

शिंदेंच्या मंत्र्यांचा वेगळा दरबार

z मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंत्र्यांना आठवडय़ातील तीन दिवस मंत्रालयात उपस्थित राहण्याचे आदेश दिलेले असताना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यांच्या आमदारांचा वेगळा ‘दरबार’ भरवण्यास सुरुवात केली आहे.

z त्यांच्या गटातील मंत्र्यांनी मंत्रालयासमोरील बाळासाहेब भवनात प्रत्येक आठवडय़ात सोमवार ते बुधवार या तीन दिवसांत तीन सत्रांत जनतेच्या भेटीसाठी उपलब्ध रहावे, असे आदेश उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जारी केले आहेत.

z शिवसेनेचे अकरा मंत्री तीन दिवस सकाळी 9 ते 11, त्यानंतर 11 ते दुपारी 2 आणि संध्याकाळी 4 ते 7 या वेळेत लोकांना भेटतील, असे आदेश जारी केले आहे. त्यामुळे महायुतीमध्ये समन्वय नसल्याचे एकीकडे स्पष्ट झाले आहे.