‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजनेतील लाभार्थी महिलांची पडताळणी अंगणवाडी सेविकांमार्फत करण्यात येत आहे. लाभार्थी महिलेच्या कुटुंबाकडे चारचाकी वाहन दिसले तर योजनेचा लाभ जागच्या जागी रद्द केला जाणार आहे. लाडक्या बहिणींना 2100 रुपये देण्यास सुरू करण्यापूर्वी अपात्र महिलांना योजनेतून वगळा, अशा सूचना महिला व बालकल्याण विभागाकडून देण्यात आल्या आहेत.
महिला व बालकल्याण विभागाचे सचिव डॉ. अनुप कुमार यादव यांनी सोमवारी ऑनलाईन बैठक घेत यासंदर्भात राज्यातील सर्व अधिकाऱ्यांना सूचना दिल्या होत्या. ‘लाडकी बहीण’ योजनेतील लाभार्थी महिलांच्या कुटुंबाकडे चारचाकी वाहन आहे का याची माहिती परिवहन विभागाकडून घेऊन ती प्रत्येक जिल्हाधिकाऱ्यांनाही पाठवण्यात आली आहे. लाभार्थी महिलेच्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न अडीच लाखांच्या आत असावे, कुटुंबात कुणीही सरकारी नोकरीत नसावे, संजय गांधी निराधार योजनेसारख्या अन्य योजनांचा लाभ लाभार्थी महिलेने घेतलेला नसावा याचीही खातरजमा केली जात आहे. कुटुंबात चारचाकी वाहन असेल, पण लाभार्थी महिला विभक्त राहत असेल तर लाभ मिळेल.
चुकीची माहिती दिलेल्या लाभार्थींवर कारवाई
‘लाडकी बहीण’ योजनेच्या निकषांमध्ये बसत नसतानाही लाभ घेणाऱ्या महिलांच्या बाबतीत शासनाकडून कठोर पावले उचलली जाणार असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. अशा महिलांनी स्वतःहून या योजनेचा लाभ नाकारावा, असे आवाहनही त्यांनी केले आहे.